Thursday, January 19, 2006

दळणवळणाची साधने - सिटीबस

प्रत्येक महाविद्यालयात काही दंतकथा प्रचलित असतात, आमच्या इथेही होत्या. त्यात "वसतिगृहात पूर्वी झालेल्या दुर्भाग्यपूर्ण प्रसंगात बळी गेलेली एक नर्स, रात्रीअपरात्री (हातात मेणबत्ती घेऊन!) फिरताना दिसते" वगैरे सारख्या भूतकथा आणि इतरही काही सुरस, चमत्कारिक कथा होत्या. त्या सर्व कथांबरोबर "सिटीपोष्ट पासून महाविद्यालयापर्यंत रात्री साडेबारा वाजता शेवटची बस येते" अशी त्यातल्या त्यात कमी भयानक पण भयंकर खोडसाळ कथा आमच्या इथे प्रचलित होती. त्या नर्सप्रमाणेच ती बसही कुणीही प्रत्यक्ष पाहिली नव्हती. त्या कथेवर विसंबून रात्रीचा खेळ पाहायला गेलो की नेहमी पायपीट करत यावे लागे. शिवाय गडबडीने कुठे जायचे असेल तेंव्हा नेमकी बस यायची नाही आणि लवकर निघावे तर आपल्या स्वागताला बस हजर. एकूणच तेथील सिटीबसवाले भारीच खोडकर असावेत, मोक्याच्या वेळी झुलवणे हा त्यांचा आवडता खेळ होता. अश्याप्रकारे सिटीबसचा फार चांगला अनुभव आला नसला तरी, फार दुःख झेलावे लागले अशीही परिस्थिती नव्हती.

असे अनुभव घेऊन पुणेग्रामी येताच वाटले की "सार्वजनिक-परिवहन-सौख्यात" अडथळा आणणारे वक्री ग्रह आता मार्गी होतील. पण कसचे काय? उलट त्या सर्व वक्री ग्रहांमध्ये पीएमटी नामक आणखी एका पापग्रहाची भर पडली. पीएमटीच्या गाड्या "चालतात" यावर प्रथमदर्शनी विश्वास बसणे अवघड गेले. एका बाजूला इतक्या झुकलेल्या असतात की चालताचालता कलंडतील की काय अशी भिती वाटायची. सुरुवातीला "पुणे स्टेशन ते कर्वेनगर" बहुतेक १४३ नंबर, बसची "दशा" सुरू झाली. निर्धारित वेळेच्या अर्धा ते दीड तास उशिरा येणे नेहमीचेच. बाकी नागरिक बहुतेक सरावलेले असावेत, कारण बसस्टॉपवर मी एकटाच वेड्यासारखा उभा असे. येणारेजाणारे लोक आणि आजूबाजूचे दुकानदार प्राणिसंग्रहालयात नवीनच आलेल्या प्राण्याकडे पाहावे तसे पाहत असत.

बसस्टॉपरचा छळ कमी की काय म्हणून बसच्या आत विशेष छळ होत असे. तिथे कंडक्टर नामक अट्टल पुणेकराची (खरेतर अस्सल लिहिणार होतो, पण अट्टल लिहिले गेले, असो, आता बदलायची इच्छा होत नाही) सत्ता असते. तिथे चोर-सन्यासी असा भेदभाव नसतो, सर्वांनाच चोराप्रमाणे वागणूक दिली जाते. ३:७५ रुपये तिकीट असेल आणि चार रुपये सुटे असले तरी छातीत धडधडायचे, न जाणो सत्ताधीशाची मर्जी फिरली तर दीड तास वाट पाहिलेल्या बसमधून मानसन्मानासह उतरवेल. तिकीट घेऊन रिकामे आसन दिसते का पाहावे लागे. हो, गाडीत रिकामे बाकडे असतानाही कुणाच्या शेजारी बसायला गेलात तर जळजळीत कटाक्ष आणि कपाळावर, गतिरोधकाला लाजवतील अश्या आठ्या पाहाव्या लागतात.

बरे, चालत जावे तर कुठला "आतंकवादी" कधी हल्ला करेल सांगता यायचे नाही. दुचाकी मला रस्त्यावर चालवता येते पण इथे तोही मार्ग नव्हता, कारण इथे खड्डे, बोळ, खिंडीमधून चालवण्याचे विशेष कौशल्य लागते. शिवाय खिंड लढवायला एखादी चतुष्पाद मोकाट गाय किंवा म्हैस पुरेशी असते. एकूणच जीव मुठीत धरून बरेच दिवस काढल्यावर, परमेश्वराला माझ्या हलाखीच्या परिस्थितीची दया आली असावी किंवा पापग्रहांना बहुतेक वाकडे चालण्याचा कंटाळा येऊन ते मार्गी झाले असावेत, काहीही असो पण प्रतिकूल काळ संपून अनुकूल काळाची सुरुवात झाली. तसा सदासर्वदा प्रतिकूल काळ नव्हता, कधीकधी अनियमित बसच्या निमित्ताने "प्रियजन-द्विचक्र-सहप्रवास-योग" (विशेष व्यक्तींच्या दुचाकीवरून फिरण्याचे प्रसंग) देखील आले, पण असे अनुभव तुरळकच.

भारतात सर्वात चांगला अनुभव आला तो "बेस्ट" चा. ही संस्था आपले नाव सर्वार्थाने सार्थ करते. मुंबईतील रस्त्यांवर एकछत्री अंमल जर कुणाचा असेल तर तो बेस्टच्या गाड्यांचा. "रस्त्यावर पहिला अधिकार बेस्टचा" हे मुंबईकर ओळखून असतो. बेस्टची बस नजरेच्या टप्प्यात असताना, आपण कितीही चपळ असल्याचा अभिमान असला तरी, रस्ता ओलांडण्याच्या भानगडीत पडू नये. सकाळी आणि संध्याकाळी या बस खचाखच भरलेल्या असतात, अशावेळी बेस्ट बसमधून प्रवास न केलेल्या लोकांनी, खचाखच म्हणजे शब्दशः खचाखच असे वाचावे. त्यावेळी बसमध्ये उभे राहण्यासाठी कुठल्याही आधाराची गरज नसते कारण, तोल जाण्यास थोडासाही वाव नसतो. याहून जास्त गर्दी अर्थातच लोकलमध्ये असते. माझा चुलतभाऊ म्हणतो त्याप्रमाणे, मुंबईत दोनच शक्यता आहेत, एक म्हणजे गर्दी आणि दुसरी, खूप गर्दी. अश्या गर्दीतही कंडक्टर आपले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आजच्या युगात स्थितप्रज्ञ कोण असे जर कोणी विचारले (मला कोण विचारणार आहे? पण समजायला काय जातेय?) तर मी सांगेन खचाखच भरलेल्या गाडीत, संयम ढळू न देता आपले काम जास्तीतजास्त चोखपणे करण्याचा प्रयत्न करणारा बेस्टचा कंडक्टर.

आपल्याला ज्या स्टॉपवर उतरायचे असेल, त्याच्या दोन स्टॉप आधीपासून पुढे जाण्याच्या दृष्टीने हालचाल (शब्दशः) सुरू करावी लागते. "इच्छित स्थळी उतरण्याची काळजी प्रवाशांनी घ्यावी" अशी सूचना पुणेरी वाटली तरी, या सूचनेमागे शिष्टपणा नसून वास्तवाची जाणीव आहे हे रोज प्रवास करणाऱ्यांना कळून येईल. याप्रमाणेच "प्रवाशांनी आपले सामान स्वतःच्या मांडीवर ठेवावे" यामध्ये "स्वतःच्या" जास्तीचा वाटेलही, आपले सामान दुसऱ्याचा मांडीवर कोण कशाला ठेवेल? पण संशयाला/गोंधळाला थोडाही वाव न ठेवण्याचे बेस्टचे धोरण असावे, त्यामुळेच "६० वर्षावरील वृद्ध आणि गरोदर स्त्रियांना पुढील दरवाज्याने चढण्याची मुभा" याबरोबरच "सुरुवातीच्या स्थानका व्यतिरिक्त" असे लिहिले असते.

तर अशी ही सिटीबस, असंख्य लोकांच्या रोजच्या आयुष्याशी जोडली गेलेली. "बसमध्ये शेजारी किंवा समोर कोणी प्रेक्षणीय नसेल, तर पुढच्या स्टॉपवर कोणीतरी चढेल" असा आशावाद आणि "कोणी असेल तर, पुढच्या स्टॉपला उतरूही शकेल, जास्ती गुंतागुंत नको" असा वैराग्यपूर्ण निराशावाद दोन्हीचा एकत्र अनुभव सिटीबसमध्येच येऊ शकतो. मानवी जीवनाच्या आणि नातेसंबंधांच्या क्षणभंगुरपणाविषयी बोलताना विचारवंतांनी अशा रोजच्या जीवनातील उदाहरणाचा वापर करायला हरकत नाही. एकंदर सिटीबसचा संपर्क नेहमी येत असला तरी सिटीबसचे प्रवाशांशी संबंध कधी जिव्हाळ्याचे बनू शकत नाहीत, त्याला दोघांचाही इलाज नसतो. कधीकधी काही व्यक्ती आपल्याला आवडतात, त्या व्यक्तींनाही आपण आवडत असतो पण नियतीने ठरवलेला सहवास मर्यादित असल्याने या उपक्रमातून आठवणींशिवाय काहीच हाती लागत नाही अशी काहीशी गत असते.

शशांक जोशी

यासारखेच दळणवळणाची साधने - बस

This article was first published on www.manogat.com and can be seen here.

Get the PDF file of this article.

.

3 Comments:

At 4:00 AM, Anonymous Anonymous said...

yaala mhanatat shabdanche kees padne
aflatoon marathi!
madhun madhun Pu. La.nchi aathvan yete....
mastach lihitos
keep it up!
i read ur all stuff in one sitting
waiting for more!!

 
At 1:03 PM, Anonymous Shashank said...

"khuskhushit" hech visheshan ya lekhala deta yeil. Aani ho, faara divasaanni lekh vaachatana manmokalya gappa aikanyaacha anubhav aala, tyabaddal dhanyavaad!

Tumcha shaabdik "jhanjhaavaat" asaach chaalu raahu de!

Shashank

 
At 10:43 AM, Anonymous Anonymous said...

>>>कधीकधी काही व्यक्ती आपल्याला आवडतात, त्या व्यक्तींनाही आपण आवडत असतो पण नियतीने ठरवलेला सहवास मर्यादित असल्याने या उपक्रमातून आठवणींशिवाय काहीच हाती लागत नाही अशी काहीशी गत असते....

swaanubhava disatoy!! :D

 

Post a Comment

<< Home