Friday, February 23, 2024

कंपने, स्पंदने, लहरी आणि चहाचे आयुर्वेदिक विवेचन

 "बघा बघा, चिनी, जपानी आणि अमेरिकेच्या लोकांना शाकाहारी भारतीय संस्कृतीचे महत्त्व आता कळू लागले आहे."

"सगळे भारतीय लोक शाकाहारी असतात म्हणून कोणी सांगितले तुम्हाला? व्हायरसला कसे कळते समोरचा माणूस काय खातो?"

"शाकाहार सत्त्वगुणी आणि मांसाहार तमोगुणी असतो. शाकाहारातून निघणाऱ्या स्पंदनांतून आणि कंपनांतून रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. हा सगळा कंपनांचा/स्पंदनांचा खेळ आहे"

"नेमकी कशाची स्पंदने आणि कशाची कंपने?"

"अहो हीच तर मोठी गंमत आहे. ऊर्जेची स्पंदने आणि कंपने. जश्या ओंकारातून आणि घंटानादातून लहरी निघतात तसेच."

"आता या लहरी कोठून आल्या?"

"सोपं आहे. एका तांब्याच्या स्वच्छ पेल्यात ताजे गोमूत्र भरून घ्या. त्यात हळूच एक बोट बुडवून काढा. काय दिसेल तुम्हाला पेल्यात?"

"गोमूत्र!"

"ते तर आहेच हो. पण गोमूत्रात दिसतील तरंग, म्हणजे लहरी. गोमूत्र, शेणाचा सडा, तुळशीचे रोप, कापूर आरती ... हा सगळा लहरींचा खेळ आहे." 

"मगाशी तर म्हणालात कंपनांचा/स्पंदनांचा खेळ आहे?" 

“अहो हे सगळे एकच. हे सगळे ओढे/नाले नदीला मिळतात. नदी समुद्राला जाऊन मिळते. आणि समुद्रात काय असतात? लाटा, म्हणजे लहरी!”

.. 

आजकाल कोणत्याही पदार्थांविषयी परस्परविरोधी सल्ले मिळतात, चहा प्यावा की पिऊ नये याविषयी गोंधळात पडलेल्या एका मित्रासाठी केलेले हे आयुर्वेदिक विवेचन  ....


दुधाने कफ वाढतो (+१क)

आल्याच्या गराने पित्त कमी होते (-१पि)

आल्याच्या सालीने वात वाढतो (+१वा)

चहामुळे पित्त वाढते (+१पि)

साखरेमुळे कफ पातळ होतो (खोकल्यावर खडीसाखर खातात) (-१क)

अग्नीच्या संपर्काने पदार्थ हलका होतो, म्हणजे वात कमी होतो (-१वा)

आता हे सगळे एकत्र केल्यास 

+१क-१पि+१वा+१पि-१क-१वा = 0 

काही घंटा होत नाही, पी तू बिनधास्त 

..

करोना - एक आयुर्वेदिक गंमत

करोनाविषयी स्वघोषित आयुर्वेदाचार्याशी झालेला काल्पनिक संवाद .... 

 "करोनाच्या संदर्भात तुमच्यासारखे आयुर्वेदाचार्य मोठमोठे दावे करत आहेत आणि आयुर्वेदाची पुन्हा चर्चा होते आहे." 

 "होणार तर, हे व्हायरस, प्रतिबंधात्मक उपाय वगैरे आयुर्वेदात आधीच सांगून ठेवले आहेत. जगाला आता त्याचे महत्त्व पटायला लागले आहे." 

 "पण आयुर्वेदात व्हायरस, बॅक्टेरिया वगैरे काही नाही असे म्हणतात. नुसते कफ, वात आणि पित्त." 

 "आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेले नाही म्हणजे आपल्याला माहीत नव्हते असे नसते काही. व्हायरस कशातून पसरतो? तर हवेतून. हवा म्हणजे वात. वाताचा प्रकोप शरीरातला रस, म्हणजे ऊर्जा, शोषून घेतो तोच हा रोग होय. 'वात-रस' हा मूळ संस्कृत शब्द आहे. त्याचा पुढे इंग्रजांनी 'व्हायरस' केला." 

 "करोना पण मूळचा भारतीयच का? त्याची व्युत्पत्ती कशी सांगाल?" 

"'मा कुरु' चा 'कुरु मा' झाला. संस्कृत 'मा'चा देशी भाषेत 'ना' होतो, आणि 'कुरु' चा होतो 'कर'. बंगाल मध्ये हा ओकारान्त 'कोरो ना' झाला आणि बंगाली कम्युनिष्टांबरोबर तो चीन मध्ये पोचला. 'करू नये त्या गोष्टी केल्यावर होतो तो करोना' अशी त्याची उत्पत्ती आहे!"

"आणि कोविड १९?"

"हो तर! 'विद' म्हणजे 'जाणणे', वेद हा शब्द त्यावरूनच आला आहे. 'कः विद' चा 'को विद' झाला. कोविद म्हणजे (आयुर्वेदिक वैद्यांशिवाय या रोगाचे खरे स्वरूप) "कोण जाणू शकतो?" असे ते आहे." 

"आणि १९ चे काय ?"

"१९ ची उत्पत्तीही अगदी सहज आहे. पंचतत्त्वे, त्रिदोष आणि तीन गुणांना हाताशी धरून, त्रिलोकात भ्रमण करून पंचप्राण कंठाशी आणणारी व्याधी (५ + ३ + ३ + ३ + ५ = १९), म्हणून कोविद-१९!" 


 .... 


 "पण डोळ्यांनाच काय साध्या सूक्ष्मदर्शक यंत्रांनीही दिसत नाही म्हणे व्हायरस मग आपल्या पूर्वजांनी कसा बरे बघितला असेल?" 

"अहो या तंत्रज्ञानाच्या फार पुढे होतो आपण. दिव्यदृष्टीचे कितीतरी प्रसंग संदर्भासहीत स्पष्ट केले आहेत आपल्या ग्रंथांतून. सामान्य लोक ज्याला दिव्यदृष्टी म्हणतात ती पाश्चात्त्यांनाही अज्ञात अशी एडव्हान्स टेकनॉलॉजी होती." 

"काय सांगता?"

"तर काय! महाभारतातल्या संजयची गोष्ट तुम्हाला माहीत असेलच. ते तंत्रज्ञान म्हणजे आजच्या काळातला टीव्हीच. धृतराष्ट्र हा खरे तर एक संशोधक होता. दूरदृष्टीचे निरनिराळे प्रयोग करण्यात त्याची साधी दृष्टी गेली म्हणतात." 

"कोण म्हणतात? आणि गांधारी?"

"गांधारीचीही. क्युरी दाम्पत्याच्या कितीतरी आधी आपल्याकडे कौरव हे संशोधक दाम्पत्य होऊन गेले. धन्य आपली संस्कृती!" 

"पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राचे काय?"

"अहो यंत्राचे काय घेऊन बसलात? आपल्याकडे सूक्ष्मरूप घेऊन बागेत फिरायला गेल्यासारखे मंगळावर जाऊन येतात. आता व्यक्ती सूक्ष्म झाली तर त्यांची दृष्टी अतिसूक्ष्म होणारच ना!" 


.... 


Tuesday, November 09, 2010

उपक्रम दिवाळी अंक २०१० प्रकाशित झाला आहे. http://diwali.upakram.org इथे पाहा.

Thursday, September 28, 2006

काहीच्या काही कविता - पिवळाई

१.
कसला गोंधळ सुरू आहे
म्हणून पाहायला गेलो तर कळले
ट्रॅफिकचा लोच्या झालाय!
म्युनिसिपालटिने सिग्नलला
फक्त पिवळेच दिवे बसवलेत!

२.
हल्लीच्या डॉक्टरांवरचा
माझा विश्वासच उडालाय
आपल्याला कावीळ होते तेंव्हा
जग खरंच पिवळं असतं म्हणे!

३.
कावीळच असावी बहुतेक
सारे कसे पिवळे पिवळे दिसतेय
दवाखान्यात नेताना मात्र
अचानक म्हणाला
सारे कसे हिरवे हिरवे दिसतेय
मी रिक्षावाल्याला म्हटले,
"वेड्यांच्या इस्पितळाकडे घ्या"

४.
पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेल्या
त्या काळसर तरूणीने
रस्त्यावरून जाताना,
हलकेच मागे वळून
आपले पिवळे दात दाखवले
माझ्या हातात होता
विको वज्रदंतीचा पिवळा डबा!

५.
चाल : पहिला पाऊस पहिली आठवण - सौमित्र

पिवळे टेबल, पिवळे स्टूल
पिवळ्या वेलीवर, पिवळे फूल
पिवळे घर, पिवळे दार
पिवळ्या फोटोला, पिवळा हार ...
पिवळे स्वप्न, पिवळा भास
पिवळ्या केळ्याला, पिवळा वास
पिवळे कुत्रे, पिवळी गाय
पिवळ्या मांजराचे पिवळे पाय
पिवळी जमीन पिवळे आकाश
पिवळ्या दिव्याचा पिवळा प्रकाश
पिवळा रेडिओ, पिवळी गाणी
पिवळ्या नळाला, पिवळे पाणी
पिवळी झोप, पिवळी जाग
पिवळे प्रेम, पिवळा राग
पिवळी गंमत, पिवळा खेळ
पिवळ्या सकाळची पिवळी वेळ
पिवळा कागद पिवळी वही
पिवळ्या पेनाची पिवळी सही
पिवळी कविता पिवळ्या उपमा
पिवळ्या कवीचा पिवळा चष्मा

- शशांक जोशी

This article was first published on www.manogat.com and can be seen here
Get the PDF file of this article.

Wednesday, August 09, 2006

इशारे

प्रेयसीच्या आईच्या कडक पहाऱ्यात लपूनछपून प्रेम करणाऱ्या प्रियकराचे मनोगत.
इशारे
खुणांखुणांनी करू इशारे नकोच बोलू
तिला कळवतील लोक सारे नकोच बोलू

जसा निघे सर्प उंदराला गिळावयाला
कशास आली बया इथे ही मरावयाला
कितीक पाण्यात पाहणारे नकोच बोलू
किती खडे जागते पहारे नकोच बोलू

कधी नव्हे तो निवांत एकांत लाभताना
सखे मनीचे तुझ्यासवे गूज बोलताना
चहूकडे कान ऐकणारे नकोच बोलू
चुगलखोर हे छचोर सारे नकोच बोलू

कधी वाटते कुठे नसावा तिचा सुगावा
तुझ्या नि माझ्या भेटीचा तो सुयोग यावा
नको नको रिस्क घ्यावयाला! नकोच बोलू
खुणांखुणांनी करू इशारे नकोच बोलू

प्रेरणा - वैभव जोशी यांची इशारे ही अप्रतिम कविता.


मनोगत.कॉम वर प्रकाशित झालेली कविता इथे पाहा.
.