Sunday, March 12, 2006

माझी साहित्यविषयक महत्त्वाकांक्षा - भाग १

मोठमोठ्या लोकांचे निरीक्षण करणे हा नेहमीच माझा छंद राहिला आहे. त्यांच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींकडे माझे अगदी बारीक लक्ष असते. आजकाल त्यांच्या एका गोष्टीवर माझे लक्ष खिळून राहिले आहे. ही मोठी माणसे सतत कशा ना कशाचा तरी आढावा घेत असतात. आज ह्याचा आढावा घेऊ, उद्या त्याचा घेऊ. त्यांचे कोणतेही महत्त्वाचे वाक्य साधारणतः "याचा जर व्यापकदृष्टीने आढावा घेतला तर..." असे सुरू होते.

आढावा हा शब्द ऐकला की सुरुवातीला मला खूप हसू यायचे. कदाचित "गाढवा" या माझ्या बालपणीच्या संबोधनाशी यमक जुळत असल्याने असेल. मी ही ठरवले आपणही घ्यायचा आढावा.

१०० वर्षे आयुर्मान धरले तर एक चतुर्थांश आयुष्य आधीचेच निघून गेलेले आहे. या कालावधीत असे काहीही केले नाही की ज्यामुळे आपल्यापश्चात जनता आपले नाव काढेल. काहीजण/जणी काढतील म्हणा "आगाऊच होता मेला, बरं झालं गेला", पण त्यात काही अर्थ नाही. "काहीतरी केले पाहिजे" या विचाराने माझी झोप उडवली होती. "काय करावे म्हणजे जगात आपले नाव निदान काही वर्षे तरी राहील?". बराच विचार केल्यावर असा निष्कर्ष निघाला की जगात प्रतिष्ठा काय ती राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक आणि साहित्यिक यांनाच मिळते. माझ्या आर्थिक, सामाजिक आणि बौद्धिक मर्यादांचा विचार केला असता अनुक्रमे राजकीय नेता, सामाजिक कार्यकर्ता आणि वैज्ञानिक होणे शक्य नाही हे कठोर सत्य पुढे आले. राहता राहिले साहित्यिक. आता साहित्यिक बनणे हा एकच उपाय दिसत होता.

साहित्यातही गद्य आणि पद्य असे दोन प्रकार असतात असे शाळेत कधीतरी ऐकलेले आयतेच कामी आले. पण त्यातून नवीनच प्रश्न निर्माण झाला, सुरुवात कशापासून करायची? पद्य की गद्य? झटपट प्रसिद्धीसाठी पद्य बरे असा सुज्ञ विचार करून मी कवी व्हायचे ठरवले. प्रयत्ने वाळूचे कण रगडले तर तेलही गळते म्हणतात तर मी प्रयत्नपूर्वक लेखणीने कागद रगडले तर कविताही पाझरतील. माझा आत्मविश्वास जणू ओसंडून वहात होता. पण "पेपरमध्ये लिहिण्यापूर्वी त्याविषयाचे थोडेफार वाचन, आवश्यक नसले तरी, केले असल्यास बऱ्याचदा उपयोगी पडते. काय लिहावे? याचा फार विचार करावा लागत नाही", हे महाविद्यालयीन जीवनातले व्यावहारिक शहाणपण कामास आले. सुप्रसिद्ध कविंच्या रचना वाचायला सुरूवात केली. ह्याची कल्पना, त्याचा विचार, अमक्याचे शब्द, तमक्याचे आणखी काही अशी उचलेगिरी करून चांगल्या डझनभर कविता लिहिल्या आणि तथाकथित जाणकार लोकांना अभिप्रायार्थ दिल्या. पण हाय रे दुर्दैव! त्यांनी "अतिशय टाकाऊ", "हलक्या दर्जाच्या" "उथळ" "अर्थशून्य" अश्या शाब्दिक बाणांनी माझ्या कोवळ्या प्रतिभेचा भीष्म पितामह करून टाकला.

साहित्याच्या कारकिर्दीच्या सुरूवातीलाच असा झटका लागल्याने, माझी भारतीय क्रिकेट संघासारखी दारूण अवस्था झाली. एकंदर हा प्रकार दिसतो तितका सोपा नाही हे कळून चुकले. मी झाल्या प्रकाराचे त्रयस्थपणे विच्छेदन करायचे ठरवले. रात्र रात्र जागून, जाणकार लोकांचे इतर कविंना मिळालेले अभिप्राय वाचले. चांगले अभिप्राय मिळालेल्या कवितांचे असंख्यवेळा वाचन केले. अर्थबोध न होणाऱ्या कवितांची घसा कोरडा पडेपर्यंत स्तुती केली. साध्या, सोप्या आणि अर्थ समजणाऱ्या कवितांना, "खोली नाही" "जीवनाचा साक्षात्कार झाल्याची प्रतीती येत नाही" असे अभिप्राय दिले. मतला, मक्ता, जमीन, छंद-वृत्तांची नावे या शब्दांचा अर्थ माहित नसतानाही मुबलक वापर सुरू केला. इतकेच नव्हे तर "अर्थगहन" कवितांसाठी प्रसिद्ध अशा एका कविवर्याची कवितांची वहीदेखील मिळवली. भल्या पहाटे उठून अतिशय आदरपूर्वक त्या वहीचे वाचन सुरू केले. पहिले पान उघडले,

तुझे कान
माझे कान
जवळ आले तर
किती छान?

आता दोन माणसांचे कान एकमेकांजवळ कशाला येतील? जर तोंड कानाजवळ आले तर काही बातम्या इकडून तिकडे जातील. पण कान जवळ येऊन काय होणार आहे? एका कानातला मळ थोडीच दुसऱ्या कानात जाणार आहे? फारतर कानाच्या निमित्ताने डोकी जवळ आल्याने 'लाईसिल' च्या जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे इकडच्या उवा तिकडे असे बेकायदेशीर स्थलांतर होईल. मला तर काहीच अर्थ लागेना. पुढे तीन प्रसिद्ध समीक्षकांच्या अभिप्रायाची, अनुक्रमे ३, ७ आणि ९ पानी समीक्षेची कात्रणे चिकटवली होती. त्यामध्ये काय काय लिहिले होते विचारू नका, "शब्दरूपी कामधेनूचे दोहन करून कवीने अर्थरूपी अमृताचा जणू महासागरच निर्माण केला आहे", "शब्दरूपी मेघातून बरसणाऱ्या अर्थरूपी थेंबानी, वाचकांच्या कल्पनाशक्तीच्या हिरवळीला चालना दिली आहे" असे काहीबाही त्यात लिहिले होते. हे समीक्षक लोक इतके जाडजूड शब्द का वापरतात कळत नाही. चुकून एखाद्या वाक्याचा अर्थ लागला तर यांची बायको यांना जेवायला देत नाही की काय कोण जाणे? असो मी पुढचे पान उलटले,

तुझी मान
माझी मान
काळी काळी
गोरी पान

घ्या! इतकी टाकाऊ रचना मी कधीही वाचली नव्हती. चार वर्षाच्या पोरालाही ऐकवली असती तर "काय येडं आहे" असा अभिप्राय आला असता. बस झाले पुढे असलेली ७, ९ आणि ११ पानी समीक्षा वाचण्याचे धाडस झाले नाही. "कवी बनायला नको" असा असा अंतर्ध्वनी उमटला. मी नेहमीच ऐकतो तो. अतिशय जड मनाने मी कवी बनण्याच्या इच्छेचा त्याग करून लेखक बनण्याचा निर्णय घेतला.

क्रमश:

शशांक जोशी


This article was first published on www.manogat.com and can be seen here.
.

13 Comments:

At 8:13 PM, Blogger Prashant M Desai said...

bhannaT aahe tujhi mahatvakankSha.

 
At 6:58 PM, Anonymous Anonymous said...

hi,
i m sorry i dunno whether i shud write it here or not.....but tuzya www.shankjoshi.org varchi ek suddha like open hot nahi....runtime error yete :(
what to do?

 
At 6:59 PM, Anonymous Anonymous said...

sorry.....it was be www.shashankjoshi.org

 
At 1:48 PM, Blogger shashank said...

धन्यवाद प्रशांत, अनॉनिमस,

Anonymous, I think you have bookmarked the earlier old url. give the url again in your browser, or click on this http://www.shashankjoshi.org or click on http://www.geocities.com/shashyajoshi/

 
At 1:31 PM, Anonymous Anonymous said...

samorchya konadyat ubhi hindmaataa....
shashankchya fans madhe maza number pahila :D

 
At 10:39 AM, Blogger shashank said...

अनॉनिमस आणि किशोरराव,
प्रतिसादावद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

शशांक

 
At 9:59 PM, Anonymous Anonymous said...

त्या कानाच्या आणि मानेच्या चारोळ्या वाचून हसून हसून पुरेवाट झाली. मस्तंच लिहिलंय.

 
At 12:56 PM, Anonymous Anonymous said...

Read all your articles and poems (!), thoroughly entertaining. reminds of Pu La. Keep the good work

 
At 10:55 PM, Blogger shashank said...

वर्षा आणि निनावी (अनॉनिमस :) )
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिसादांमुळे पुन्हा काही लिहिण्याची उभारी आली आहे :)
कळावे, लोभ असावा.
शशांक

 
At 11:50 PM, Anonymous Anonymous said...

nakkich tumhi ek sashakt oh... sorry
samagra lekhak honar yat kahi ek shanka nahi.
asech lihit raha.
very nice.


from
vpm

 
At 6:09 AM, Blogger shashank said...

धन्यवाद vpm! :)

 
At 10:12 AM, Anonymous Anonymous said...

navin kahi lihile nahi ka?
tumchya likhanachi aamhi vat pahtoy

vpm

 
At 6:32 AM, Anonymous Anonymous said...

shashankya leka Aavadaln rey tuzn udhalan ! kharachn ! Aaishappat !! jara Bhetuch leka contact karch mehi barreech jangaltod karnyacha gunha kela aahe
madshri barobar Shriniwas Hemade

 

Post a Comment

<< Home