Saturday, February 11, 2006

व्हॅलेन्टाइन्स डे विशेष - त्याला धक्का द्या!

व्हॅलेन्टाइन्स डे विशेष

व्हॅलेन्टाइन डे जसजसा जवळ येतोय तसतसे सर्व माध्यमांमध्ये हा इव्हेंट 'कॅश' करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. "व्हॅलेन्टाइन डे ला काय कराल?", "तिला/त्याला काय भेटवस्तू द्याल?", "फिरायला कुठे जाल?" यासारख्या लेखांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातल्या "सरप्राइज़ हिम!" या लेखाच्या कल्पनेने मी अगदी प्रभावित झालो. ("प्रभावित"चे इंप्रेस्ड किंवा अफेक्टेड हे दोन्ही अर्थ लागू आहेत) मराठी

प्रेमीयुगलांसाठी मराठीतूनही मार्गदर्शनपर काही असावे असे वाटल्याने हा लेखनप्रपंच.

भाग १ - मुलींसाठी : त्याला धक्का द्या!

"त्याला धक्का द्या" म्हणजे पाडण्यासाठी नाही काही! (पडलेल्याला काय पाडणार? पडलेला म्हणजे प्रेमात पडलेला हो) तर हा धक्का आहे आश्चर्याचा. चला तर मग त्याला धक्का देऊ!

वेळेवर पोहोचा:

नेहमी बराच वेळ ताटकळत राहणाऱ्या त्याला यासारखा आश्चर्याचा धक्का नाही.

त्याचे एखाददुसरे म्हणणे मान्य करा:

"तुमचेच खरे" ची सवय त्याला लागली आहे खरी. ती सवय मोडू नये म्हणून तुम्ही प्रयत्नही करत असता. आजच्या दिवशी एखादी (तुम्हाला सोयीस्कर) गोष्ट त्याच्या मनासारखी करा.

त्याला थोडावेळ शांतपणे बसू द्या:

नेहमी लहानसहान गोष्टींसाठी तुम्ही त्याला पिटाळता. आज त्याला थोडा वेळ शांतपणे बसू द्या.

शांत राहा:

इतर दिवशी तुमच्या बोलण्यापुढे त्याला तोंड उघडायची संधी मिळत नाही. आज शांत राहून त्याला थोडा वेळ बोलण्याची संधी द्या.

त्याला इकडेतिकडे पाहू द्या:

तुमच्यासोबत असतानाही कधीकधी तो चोरून इकडेतिकडे पाहतो. काहीवेळा तुम्ही त्याला 'रंगेआखो' पकडले आणि झापलेही आहे. आज मात्र तो 'तसा' सापडल्यास एक मिश्किल कटाक्ष टाका किंवा हसून "नॉट्टी बॉय!" किंवा "चावट कुठला!" असे काहीसे म्हणा. फारच सौहार्दाचे संबंध असतील तर गालगुच्चाही घ्यायला हरकत नाही.

सर्वात मोठा धक्का:

"आपला संबंध संपला, यापुढे मी तुला कधीही भेटणार नाही आणि तू मला भेटायचा प्रयत्न करू नकोस" असे म्हणून थोड्यावेळाने, "नाही हं! मी गंमत करत होते" असे म्हणा. (महत्त्वाची सूचना: असे बोलण्यापूर्वी तो कमकुवत हृदयाचा नाही याची खात्री करून घ्या. आनंद सहन न होऊन काही बरेवाईट होण्याची शक्यता आहे. तसेच हे बोलताना त्याचा हात हातात घ्या, नाही नाही भावनिक आधार वगैरे काही नाही, तर पडत्या फळाची आज्ञा घेऊन तो लगेच पसार होऊ नये म्हणून!)

(जमल्यास/सुचल्यास) क्रमशः

शशांक जोशी


Get the PDF file of this article.

2 Comments:

At 7:33 PM, Blogger Tulip said...

LOL शशांक. it's hilarious . भाग - 2 तिला धक्का द्या ... पण लिहून टाक लवकर.

 
At 12:03 PM, Blogger shashank said...

धन्यवाद tulip,
भाग दोन आला! :)

शशांक

 

Post a Comment

<< Home