Monday, February 13, 2006

व्हॅलेन्टाइन्स डे विशेष - भाग २

व्हॅलेन्टाइन्स डे विशेष

भाग १ - इथे वाचा

भाग २ - मुलांसाठी टिपा

ह्या विषयामध्ये उपजतच कच्च्या असणाऱ्या मुलांसाठी विशेष मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. विषय सोपा व्हावा म्हणून मुलांचे शरणागत, मुत्सद्दी आणि मुमुक्षू असे वर्गीकरण केले आहे. ज्यांनी मानसिक गुलामगिरी स्वीकारली आहे ते शरणागत. ज्यांना आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे ते मुत्सद्दी आणि ज्यांना मुक्तीची इच्छा आहे ते मुमुक्षू.

शरणागतांसाठी

आज ती वेळेवर येण्याची शक्यता आहे. (हो "त्याला धक्का द्या!" हा "व्हॅलेन्टाइन्स डे विशेष" लेख वाचला असणारच ) त्यामुळे रोज तुम्हाला मिळणारा मोकळा वेळ कमी आहे हे लक्षात ठेवा. फावल्या वेळात पक्षीनिरीक्षणाचा छंद तुम्हाला जडला आहे. नाही नाही त्यात वाईट काही नाही. कोणता ना कोणता छंद असावा असे पालकांनी आणि शिक्षकांनी तुमच्या लहानपणीच सांगितले आहे आणि तुम्ही त्यांच्या शब्दाबाहेर का आहात? पण आज त्या छंदाला आवर घालावा. म्हणजे चौफेर नज़र असावी पण गनीम येताना दिसल्यास शून्यात नज़र लावण्याचा अभिनय करावा. (अशावेळी नज़र एखाद्या प्रेक्षणीय स्थळावर ठेवायला हरकत नाही, पण शून्यात पाहत असण्याचा अभिनय करणे महत्त्वाचे)

मनातले न बोलण्याची कला तुम्ही अंगी बाणवाली आहेच, आज त्याची परीक्षा आहे. इतर दिवशी कधीकधी तुम्ही मनातले बोलून जाता, आज तसे करून चालणार नाही. उदाहरणार्थ,

  • सुमार ड्रेसिंग सेन्सला "काय बुजगावणे दिसतेय" ऐवजी "वाह! तुझा चॉइस म्हणजे अगदी मस्त!" म्हणावे.
  • उथळ आणि अर्थशून्य बडबड ऐकून "दोन मिनिटं शांत राहायला काय घेशील?" ऐवजी "तुझं बोलणं तासनतास ऐकत राहावं असं वाटतं" म्हणावे.
  • "माझ्यासाठी पेप्सी आणशील का?" असे म्हटल्यावर "मी काय वेटर आहे?" ऐवजी "तू काय म्हणशील ते आणतो, चंद्र, तारे ... वगैरे वगैरे" म्हणावे.
  • तिची नाटकं पाहून तुम्हाला धडकी भरत असली तरी "दिल धडकता है" वगैरे फिल्मी डायलॉग मारावेत.

मुत्सद्दी प्रेमवीरांसाठी

मुत्सद्देगिरीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. लढाई जितकी अवघड तितका विजय आनंददायक असतो. आजचा दिवस शत्रुपक्षाला खजील करण्याची सर्वात मोठी संधी आहे हे लक्षात ठेवा. "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" या नात्याने आपल्या गनीमाकडे नसणाऱ्या गोष्टींची वाहवा करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. उदाहरणार्थ गनीम पारंपरिक वेषात असेल तर पाश्चात्य वेषातील मुलीकडे पाहून हलकेच "फंडू!", "सही!"असे उसासे टाकावेत आणि गनीम पाश्चात्य वेषात असेल तर पारंपरिक वेषातील मुलींकडे पाहून "वाह!", "छान!"असे उद्गार काढावेत. अर्थात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असल्याने सर्वसामान्य टिपा देता येत नाहीत. आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करावा.

मुमुक्षूंसाठी

"त्याला धक्का द्या!" हा व्हॅलेन्टाइन्स डे विशेष लेख वाचून "सर्वात मोठा धक्का" देण्याचा कट नक्कीच शिजला असणार आहे. तुम्ही तो लेख वाचला आहे (आणि हा देखील) हे कळू देऊ नये. मोकळे, सुटसुटीत कपडे आणि धावायचे जोडे घालावेत. हात हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास, पाणी पिण्याच्या निमित्ताने किंवा केस नीट करण्याच्या निमित्ताने आपला हात वाचवावा. आणि "आपला संबंध संपला, यापुढे मी तुला कधीही भेटणार नाही आणि तू मला भेटायचा प्रयत्न करू नकोस"असे वाक्य ऐकताच तडक उठून बाजूला व्हावे. सुरक्षित अंतरावर जाताच (चेहऱ्यावरील आनंद लपवून) "मला खूप वाईट वाटतेय. पण तुला असे वाटत असल्यास आपला संबंध पुढे वाढवण्यात अर्थ नाही." असे म्हणून उत्तराची वाट न पाहता पळ काढावा.

आपण कुठल्या प्रकारचे आहात याचा विचार करून त्यानुसार वागावे. आपापल्या उद्देशात या व्हॅलेन्टाइन दिनी तुम्ही यशस्वी व्हाल याची आम्हांस खात्री आहे.

सर्वेभवन्तु सुखिन: ।

शशांक जोशी

Get the PDF file of part 1 and 2 together

.

5 Comments:

At 10:51 PM, Blogger borntodre@m said...

ekadam sahi ahe!

 
At 4:26 AM, Blogger shashank said...

धन्यवाद!

 
At 11:21 PM, Blogger Vishal said...

झकास !

 
At 3:46 AM, Anonymous Anonymous said...

sahi. mail var ale he. mhanun pratikriya dyayala ale. fundu sahi waa :)

 
At 6:11 AM, Blogger shashank said...

धन्यवाद Anonymous! :)

 

Post a Comment

<< Home