Monday, February 13, 2006

व्हॅलेन्टाइन्स डे विशेष - भाग २

व्हॅलेन्टाइन्स डे विशेष

भाग १ - इथे वाचा

भाग २ - मुलांसाठी टिपा

ह्या विषयामध्ये उपजतच कच्च्या असणाऱ्या मुलांसाठी विशेष मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. विषय सोपा व्हावा म्हणून मुलांचे शरणागत, मुत्सद्दी आणि मुमुक्षू असे वर्गीकरण केले आहे. ज्यांनी मानसिक गुलामगिरी स्वीकारली आहे ते शरणागत. ज्यांना आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे ते मुत्सद्दी आणि ज्यांना मुक्तीची इच्छा आहे ते मुमुक्षू.

शरणागतांसाठी

आज ती वेळेवर येण्याची शक्यता आहे. (हो "त्याला धक्का द्या!" हा "व्हॅलेन्टाइन्स डे विशेष" लेख वाचला असणारच ) त्यामुळे रोज तुम्हाला मिळणारा मोकळा वेळ कमी आहे हे लक्षात ठेवा. फावल्या वेळात पक्षीनिरीक्षणाचा छंद तुम्हाला जडला आहे. नाही नाही त्यात वाईट काही नाही. कोणता ना कोणता छंद असावा असे पालकांनी आणि शिक्षकांनी तुमच्या लहानपणीच सांगितले आहे आणि तुम्ही त्यांच्या शब्दाबाहेर का आहात? पण आज त्या छंदाला आवर घालावा. म्हणजे चौफेर नज़र असावी पण गनीम येताना दिसल्यास शून्यात नज़र लावण्याचा अभिनय करावा. (अशावेळी नज़र एखाद्या प्रेक्षणीय स्थळावर ठेवायला हरकत नाही, पण शून्यात पाहत असण्याचा अभिनय करणे महत्त्वाचे)

मनातले न बोलण्याची कला तुम्ही अंगी बाणवाली आहेच, आज त्याची परीक्षा आहे. इतर दिवशी कधीकधी तुम्ही मनातले बोलून जाता, आज तसे करून चालणार नाही. उदाहरणार्थ,

  • सुमार ड्रेसिंग सेन्सला "काय बुजगावणे दिसतेय" ऐवजी "वाह! तुझा चॉइस म्हणजे अगदी मस्त!" म्हणावे.
  • उथळ आणि अर्थशून्य बडबड ऐकून "दोन मिनिटं शांत राहायला काय घेशील?" ऐवजी "तुझं बोलणं तासनतास ऐकत राहावं असं वाटतं" म्हणावे.
  • "माझ्यासाठी पेप्सी आणशील का?" असे म्हटल्यावर "मी काय वेटर आहे?" ऐवजी "तू काय म्हणशील ते आणतो, चंद्र, तारे ... वगैरे वगैरे" म्हणावे.
  • तिची नाटकं पाहून तुम्हाला धडकी भरत असली तरी "दिल धडकता है" वगैरे फिल्मी डायलॉग मारावेत.

मुत्सद्दी प्रेमवीरांसाठी

मुत्सद्देगिरीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. लढाई जितकी अवघड तितका विजय आनंददायक असतो. आजचा दिवस शत्रुपक्षाला खजील करण्याची सर्वात मोठी संधी आहे हे लक्षात ठेवा. "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" या नात्याने आपल्या गनीमाकडे नसणाऱ्या गोष्टींची वाहवा करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. उदाहरणार्थ गनीम पारंपरिक वेषात असेल तर पाश्चात्य वेषातील मुलीकडे पाहून हलकेच "फंडू!", "सही!"असे उसासे टाकावेत आणि गनीम पाश्चात्य वेषात असेल तर पारंपरिक वेषातील मुलींकडे पाहून "वाह!", "छान!"असे उद्गार काढावेत. अर्थात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असल्याने सर्वसामान्य टिपा देता येत नाहीत. आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करावा.

मुमुक्षूंसाठी

"त्याला धक्का द्या!" हा व्हॅलेन्टाइन्स डे विशेष लेख वाचून "सर्वात मोठा धक्का" देण्याचा कट नक्कीच शिजला असणार आहे. तुम्ही तो लेख वाचला आहे (आणि हा देखील) हे कळू देऊ नये. मोकळे, सुटसुटीत कपडे आणि धावायचे जोडे घालावेत. हात हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास, पाणी पिण्याच्या निमित्ताने किंवा केस नीट करण्याच्या निमित्ताने आपला हात वाचवावा. आणि "आपला संबंध संपला, यापुढे मी तुला कधीही भेटणार नाही आणि तू मला भेटायचा प्रयत्न करू नकोस"असे वाक्य ऐकताच तडक उठून बाजूला व्हावे. सुरक्षित अंतरावर जाताच (चेहऱ्यावरील आनंद लपवून) "मला खूप वाईट वाटतेय. पण तुला असे वाटत असल्यास आपला संबंध पुढे वाढवण्यात अर्थ नाही." असे म्हणून उत्तराची वाट न पाहता पळ काढावा.

आपण कुठल्या प्रकारचे आहात याचा विचार करून त्यानुसार वागावे. आपापल्या उद्देशात या व्हॅलेन्टाइन दिनी तुम्ही यशस्वी व्हाल याची आम्हांस खात्री आहे.

सर्वेभवन्तु सुखिन: ।

शशांक जोशी

Get the PDF file of part 1 and 2 together

.

Saturday, February 11, 2006

व्हॅलेन्टाइन्स डे विशेष - त्याला धक्का द्या!

व्हॅलेन्टाइन्स डे विशेष

व्हॅलेन्टाइन डे जसजसा जवळ येतोय तसतसे सर्व माध्यमांमध्ये हा इव्हेंट 'कॅश' करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. "व्हॅलेन्टाइन डे ला काय कराल?", "तिला/त्याला काय भेटवस्तू द्याल?", "फिरायला कुठे जाल?" यासारख्या लेखांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातल्या "सरप्राइज़ हिम!" या लेखाच्या कल्पनेने मी अगदी प्रभावित झालो. ("प्रभावित"चे इंप्रेस्ड किंवा अफेक्टेड हे दोन्ही अर्थ लागू आहेत) मराठी

प्रेमीयुगलांसाठी मराठीतूनही मार्गदर्शनपर काही असावे असे वाटल्याने हा लेखनप्रपंच.

भाग १ - मुलींसाठी : त्याला धक्का द्या!

"त्याला धक्का द्या" म्हणजे पाडण्यासाठी नाही काही! (पडलेल्याला काय पाडणार? पडलेला म्हणजे प्रेमात पडलेला हो) तर हा धक्का आहे आश्चर्याचा. चला तर मग त्याला धक्का देऊ!

वेळेवर पोहोचा:

नेहमी बराच वेळ ताटकळत राहणाऱ्या त्याला यासारखा आश्चर्याचा धक्का नाही.

त्याचे एखाददुसरे म्हणणे मान्य करा:

"तुमचेच खरे" ची सवय त्याला लागली आहे खरी. ती सवय मोडू नये म्हणून तुम्ही प्रयत्नही करत असता. आजच्या दिवशी एखादी (तुम्हाला सोयीस्कर) गोष्ट त्याच्या मनासारखी करा.

त्याला थोडावेळ शांतपणे बसू द्या:

नेहमी लहानसहान गोष्टींसाठी तुम्ही त्याला पिटाळता. आज त्याला थोडा वेळ शांतपणे बसू द्या.

शांत राहा:

इतर दिवशी तुमच्या बोलण्यापुढे त्याला तोंड उघडायची संधी मिळत नाही. आज शांत राहून त्याला थोडा वेळ बोलण्याची संधी द्या.

त्याला इकडेतिकडे पाहू द्या:

तुमच्यासोबत असतानाही कधीकधी तो चोरून इकडेतिकडे पाहतो. काहीवेळा तुम्ही त्याला 'रंगेआखो' पकडले आणि झापलेही आहे. आज मात्र तो 'तसा' सापडल्यास एक मिश्किल कटाक्ष टाका किंवा हसून "नॉट्टी बॉय!" किंवा "चावट कुठला!" असे काहीसे म्हणा. फारच सौहार्दाचे संबंध असतील तर गालगुच्चाही घ्यायला हरकत नाही.

सर्वात मोठा धक्का:

"आपला संबंध संपला, यापुढे मी तुला कधीही भेटणार नाही आणि तू मला भेटायचा प्रयत्न करू नकोस" असे म्हणून थोड्यावेळाने, "नाही हं! मी गंमत करत होते" असे म्हणा. (महत्त्वाची सूचना: असे बोलण्यापूर्वी तो कमकुवत हृदयाचा नाही याची खात्री करून घ्या. आनंद सहन न होऊन काही बरेवाईट होण्याची शक्यता आहे. तसेच हे बोलताना त्याचा हात हातात घ्या, नाही नाही भावनिक आधार वगैरे काही नाही, तर पडत्या फळाची आज्ञा घेऊन तो लगेच पसार होऊ नये म्हणून!)

(जमल्यास/सुचल्यास) क्रमशः

शशांक जोशी


Get the PDF file of this article.

Thursday, February 02, 2006

पुण्याची सवय झाली!

पुणेग्रामी राहण्याचे सौभाग्य (सौभाग्य म्हणा वा दुर्भाग्य, Everything is relative!) एक वर्षच होते. त्याकाळात आलेले अनुभव*, शिवाय इतर ऐकीव, वाचीव (असा काही शब्द आहे का?) गाळीव माहिती, थोडी अतिशयोक्ती आणि थोडा कल्पनाविलास यांच्या साहाय्याने समस्त पुणेकर वाचकांची क्षमा मागून ही रचना सादर करत आहे. या रचनेकडे केवळ विनोद म्हणून पाहावे ही नम्र विनंती.


पुण्याची सवय झाली!

जे खरे ते लपवण्याची सवय झाली,
या तुझ्या शहरी, जिण्याची सवय झाली!

पुस्तके ना वाचली, ना वृत्तपत्रे
रोज 'पाट्या' वाचण्याची सवय झाली

हो! मलाही लागले पाणी पुण्याचे
काय सांगू? भांडण्याची सवय झाली

कीस शब्दांचाच नुसता पाडताना
मूळ मुद्दा चुकवण्याची सवय झाली

भांडल्याविन जात नाही दिवस माझा
वाटते आता पुण्याची सवय झाली

शशांकप्रेरणा - गज़ल


* पीएमटीचा अनुभव इथे वाचा.


This was first published on www.manogat.com and can be seen here
.