Sunday, March 12, 2006

माझी साहित्यविषयक महत्त्वाकांक्षा - भाग २

या आधी माझी साहित्यविषयक महत्त्वाकांक्षा - भाग १

माझ्या साहित्यप्रवासाच्या पहिल्या प्रयत्नात जोरदार अपयश आले होते. असे असले तरी, झाल्या प्रकाराने खचून जायचे नाही, साहित्याची सेवा करताना जीव गेला तरी बेहत्तर, काहीही झाले तरी साहित्यसाधना सोडायची नाही, अशा क्रांतिकारी विचारांनी मन भरून गेले. लेखक व्हायचा निर्णय घेतला खरा पण आता पुढे कसे जायचे. इथे पुन्हा माझा छंद कामी आला. अपयश आल्यावर मोठी माणसे काय करतात? निवडणुकीत पडल्यावर नेतेमंडळी, "हा अनीतीचा नीतीवर विजय आहे. ज्यांच्यासाठी आम्ही आमचे घरदार विसरून दिवसरात्र झटलो त्यांना धनदांडग्यांचा 'हात' धरावासा वाटतो? लोकांची सारासारविवेकबुद्धी वाढण्याची गरज आहे", असे विश्लेषण करतात. समीक्षकहृदयसम्राट साहित्यिक, फसलेल्या प्रयत्नांना, "नवा प्रयोग होता, वाचकांची वैचारिक पातळी अजून वाढायला हवी" असे म्हणतात. बिचाऱ्या वैज्ञानिकांना मात्र अपयशाचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडता येत नाही. ते अपयशाचे शास्त्रीय आणि गणिती पद्धतीने विश्लेषण करतात. मी ही ठरवले आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढची पावले टाकायची.

मी झटून कामाला लागलो. मिळतील तेथून आणि मिळतील ती पुस्तके जमा केली. अनेक कथा, कादंबऱ्या, निबंध, नाटके यांचा अक्षरशः वाळवीप्रमाणे फडशा पाडला. असंख्य निरीक्षणे, परीक्षणे आणि समीक्षा वाचल्या. त्यातून गद्य लेखनात असणारे निरनिराळे उप-प्रकार लक्षात आले. ऐतिहासिक, भावनात्मक, रहस्यमय, कौटुंबिक ... यादी बरीच लांब होत होती. अशी लांब यादी पाहता, मारुतीची वाढलेली शेपटी पाहून रावणाची कशी अवस्था झाली असेल याचा अंदाज आला. शेपटीला आग लावण्याची आज्ञा रावणाने का बरे दिली असावी हे ही समजले.

"एकावेळी पूर्ण यादी न पाहता केवळ एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे", थोडक्यात, मोगल, निजाम आणि अदिलशहा या सर्वांना एकदम न डिवचता, एकावेळी एकेकाचा निकाल लावावा असा गनिमी कावा करायचे ठरवले. पण ऐतिहासिक लिखाणाला लागणारे कठीण संशोधनकार्य जमेल की नाही शंकाच होती शिवाय इतिहासाबाबत समाज खूपच संवेदनशील असल्यामुळे चुकून आपल्या लिखाणामुळे कुणाच्या भावना दुखावल्या तर घरात तोडफोड व्हायची. त्यामुळे "माझ्या हातून ऐतिहासिक लिखाण होऊ नये ही श्रींची इच्छा" असा विचार करून मी तो विचार सोडून दिला.

भावनात्मक लिखाण म्हणजे नक्की काय प्रकार आहे हे मात्र कळत नव्हते. सर्व प्रकारच्या लेखकांमध्ये भावनात्मक लेखन करणाऱ्यांचे स्थान सर्वात वरचे. त्यातही पुन्हा दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात कथानक अगदी गोडधोड असते. यातली सगळीच पात्रे सत्ययुगातून किंवा देवलोकातून आल्यासारखी असतात. एकमेकांविषयी प्रेम अगदी ऊतु जात असते. अशा कथांमध्ये घोड्याएवढ्या वाढलेल्या मुलाला आई, "बबडू", "शोनू" अशा हाका मारते. कर्ता, कर्म, क्रियापद सगळ्यांचा 'लडिवाळ अपभ्रंश' केलेला असतो. प्रत्येक वाक्य पूर्णविरामाऐवजी उद्गारवाचक चिन्हाने संपते. अशा कथा वाचताना सर्वसामान्य वाचकांचा चेहरा, अतिशय आंबट चिंच खाल्ल्यावर किंवा गाढ झोपेतून एखाद्याला उठवून त्याच्या तोंडावर विजेरीचा प्रकाशझोत टाकल्यावर जसा दिसेल अगदी तसा होतो. पुन्हा या गोडधोडाच्या पंगतीत विनोदाची फोडणी देण्याचा केविलवाणा प्रयत्नही असतो. अर्थात तो वाचून कोणालाही हसू येत नाही ही गोष्ट निराळी. असले एक पुस्तक एकदा वाचायला घेतले, पहिल्या १/२ पानातच मळमळायला लागले. "डोक्याला मुंग्या येणे" हा शब्दप्रयोग, अशीच एखादी कथा वाचून झीट आलेल्या कोण्या बिचाऱ्याने रूढ केला असावा. मुंग्याच त्या, गोड काही दिसले की येणारच. असला प्रकार जर आपल्याला धड वाचता येत नाही मग लिहिणे दूरच.

दुसरा प्रकार पहिल्याच्या अगदी उलटा. या प्रकारच्या कथा थोड्या गंभीर ढंगाच्या असतात. "भावनांचा सुंदर आविष्कार", "उत्कट, भावनाप्रधान लेखन", "मनातील तरल भावांचे चित्रण" अशा परीक्षणाने गौरवलेली अशी गंभीर पुस्तके वाचून, मी हसून गडबडा लोळत असे. पण मान्यवर लोक मात्र अतिशय गंभीर चेहऱ्याने त्यावर दोन दोन दिवस चर्चासत्रे चालवतात, समीक्षक लोक अगम्य भाषेत मूळ पुस्तकाच्या लांबीइतकी समीक्षा लिहितात. "एका लहान मुलाने बाहेर पावसात भिजणारे कुत्र्याचे पिलू उचलून घरात आणले" ही एका ओळीची कथा ३०/४० पानात अतिशय रटाळ पद्धतीने सांगितली असते. यांच्या कथेतील प्रत्येक पात्र हे "आनंद" मधल्या राजेश खन्नाच्या पात्रापेक्षा हजारपट भावनाप्रधान असते. आजी, आजोबा, आई, वडील, मुलगा, मुलगी, मित्र-मैत्रिणी यांच्यात असणारे संबंध विनाकारण ताणलेले असतात. यातले कोणतेही पात्र समाधानी किंवा आनंदी नसते. एक अतिशय भावनाप्रधान म्हणून नावाजलेली कथा मी वाचायला घेतली. कथेचे नाव होते "हेमाची काकू". कथेचे सूत्र थोडक्यात असे, "लहान असताना हेमाने, काकू दुपारी झोपली असताना तिच्या कानात केरसुणीचे टोक घालून तिची झोपमोड केली, परिणामी हेमाच्या काकूने हेमाच्या कानाखाली त्याचे पडसाद उठवले. पुढे हेमा मोठी झाली पण झाला प्रकार विसरली नाही, पण काही प्रसंगामुळे तिला पश्चात्ताप होऊन पुन्हा सगळे आलबेल झाले". आता यावर लिहिलेली कथा किती मोठी असावी? ५९७ पाने? पहिली १०/१२ पाने वाचूनच गरगरायला झाले. वाचकांना जर ती लेखिका भेटली असती तर त्यांनीही हेमाच्या काकू प्रमाणे प्रतिसाद दिला असता. असो, हा प्रकारही आपल्याला जमणार नाही असा शरणागतीचा सूर उमटला.

रहस्यमय कथा लिहावी तर तिथे शेरलॉक होम्स, ऍगाथा ख्रिस्ती, काळा पहाड, फास्टर फेणे अशा देशी विदेशी गुप्तहेरांपुढे माझा शिकाऊ उमेदवार अगदीच पांडू वाटायचा. त्यांच्यासमोर माझा कसा टिकाव लागणार? तो नादही सोडून दिला. प्रेमकथांचा तर चित्रपट वाल्यांनी चावूनचावून अगदी चोथा केलेला आहे.

कौटुंबिक कथा हा सर्वात जास्त खपणारा माल आहे असे मला संशोधनाअंती आढळून आले. लिहायलाही सोप्या. बाकीचे लेखनप्रकार जर निरनिराळ्या कोरीवकाम केलेल्या मूर्ती असतील तर कौटुंबिक कथा म्हणजे साच्याचे गणपतीच. जास्त विचार करायचा नाही, साच्यात घातली की कथा तयार. कौटुंबिक कथांमध्ये एक भलेमोठे कुटुंब असते. सर्वगुणसंपन्न अशी सून असते. खलनायिकेचे वेगळे पात्र असेल तर ठीक, नाहीतर सासू ते काम करू शकते. सासू चांगली हवी असेल तर मात्र, नणंद, भावजय अशा सहाय्यक खलनायिका हुडकाव्या लागतात. दुष्ट पात्र शक्यतो महिलावर्गातले असावे, पुरूषपात्र तितके परिणामकारक वाटत नाही. सर्वगुणसंपन्न नायिका आणि सर्वावगुणसंपन्न (सर्व+अवगुण+संपन्न) खलनायिका यांच्या जोडीला प्रेमळ सासरे, कर्तबगार नवरा, चहाडखोर शेजारीण वगैरे पात्रे असतात. अगदी बारकाईने अभ्यास करून मी ही एक कौटुंबिक कथा लिहिली. ती घेऊन एका समीक्षकाच्या घरी गेलो असता त्यांच्या ७० वर्षीय मातोश्रींनी, ही कथा जशीच्या तशी, अमुक वाहिनीवरच्या तमुक मालिकेत येऊन गेली आहे असे सांगितले. याशिवाय सर्व कौटुंबिक कथांयोग्य मालमसाला आता वापरून झाला आहे अशीही बातमी दिली. हाय रे दुर्दैव! इथेही आपला निभाव लागणार नाही हे स्पष्ट झाले.

हे जमणार नाही, ते जमणार नाही असे काट मारता मारता यादी कधी संपली ते कळलेच नाही. आपली साहित्यिक बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणे शक्य नाही या विचाराने मला अपार खिन्नता आली. मी उदास चेहऱ्याने गेल्या काही दिवसात जमा केलेला तो पुस्तकाचा ढीग पहात होतो. अचानक माझी नजर "स्वयंरोजगार" या पुस्तकावर पडली.

पुन्हा नव्या उमेदीने एका नव्या दिवसाची सुरुवात केली,
"साहित्य रद्दी भांडार, इथे सर्व प्रकारची पुस्तके रद्दीच्या भावात घेतली व विकली जातील".

समाप्त

शशांक जोशी


This article was first published on www.manogat.com and can be seen here.
Get the PDF file of part 1 and 2 together
.

14 Comments:

At 8:52 PM, Blogger Gayatri said...

:))झकास आहे अगदी! म्हणजे शेवटी तुम्ही ऐतिहासिक, भावनात्मक, रहस्यमय, कौटुंबिक या साऱ्या लेखनप्रकारांना चाट देऊन विनोदी लिखाणाची कास धरलीत तर.

 
At 1:20 AM, Blogger shashank said...

>> :))झकास आहे अगदी!

धन्यवाद गायत्री,

>> तुम्ही ऐतिहासिक, भावनात्मक, रहस्यमय, कौटुंबिक या साऱ्या
>> लेखनप्रकारांना चाट देऊन विनोदी लिखाणाची कास धरलीत तर.

हो हो, खरे आहे :) आता "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" तसे या साहित्यप्रकारांना नावे ठेवतोय असे लोकांना वाटेलही :)

शशांक

 
At 8:27 AM, Anonymous Anonymous said...

शशांकजी,

तुम्ही लेख थोडा विनोदाच्या धाटणीने लिहिलाय खरा. पण माझ्यासारख्यांसाठी त्यात बरंच काही घेण्यासारखं आहे.

गुगलवर लेखक कसे बनावे याचा शोध घेताना आपला लेख सापडला. लिहावं लिहावं असं नेहमी वाटतं, पण लिहायला बसलं कि काहीच सुचत नाही. आणि जेव्हा सुचतं तेव्हा कागद हाताशी नसतो.

एकूण लेखक बनण्याचे आमचे स्वप्न अजून स्वप्नच आहे. तुर्तास कवी बनण्याचा विचारच कॅन्सल केलाय. :)

आपल्याकडून काही टिप्स??

चाहता.

 
At 10:58 AM, Blogger Kaustubh said...

शशांक,
संपूर्ण "समग्र मी" दोन वेळा वाचून झालं. मनापासून आवडलं.
"दिल क्या चाहता है" यासारख्या लेखांमधला Humour फार वेगळा आणि चांगला आहे.
व्हॅलेन्टाइन्स डे विशेष आणि दळणवळणाची साधने अगदी जमून आलंय.
"समग्र मी" ची link माझ्या Blog वर दिली तर चालेल?

 
At 2:36 PM, Blogger shashank said...

धन्यवाद अनॉनिमस आणि कौस्तुभ!

कौस्तुभ,

"समग्र मी" ची लिंक तुझ्या ब्लॉगवर देणार असशील तर मला आनंदच होईल.

"समग्र मी" शिवाय http://www.shashankjoshi.org देखील पाहात राहा.

शशांक

 
At 12:07 PM, Blogger rcmpost said...

शशांक मी एक सांगु?तुला चांगले लिहीता येते व ते तुला चांगले माहीत आहे.तु लेखकच आहेस का दुसरा व्यवसाय करतोस?
मला पट्कथालेखक व्हायवी खूप इच्छा आहे पण मला गेले २ वर्ष writers block झाला आहे.खरं सांगू का मला माझ्या लेखनावरच विश्वास नाही.म्हणूनच ब्लॉग सुरु केलाय.म्ह्ट्ल इथे काही दिवे लावता येतात का बघु!आता सांग बरं मला आपल्याला लिहीता येत का नाही हे कसं ओळ्खायच?

 
At 7:49 AM, Anonymous Anonymous said...

हाय, तसं मनोगतावर नेहमी वाचते तू लिहिलेलं पण आज इथेही शोधून वाचलं. मस्त आहे. पुढे मागे मी पण स्वतःचा ब्लोग बनवेन तुझ्याकडून प्रेरणा घेउन! पण मला यातली तांत्रिक माहिती नाही.
साती काळे

 
At 12:13 AM, Anonymous शैलेश श. खांडेकर said...

हा हा हा! वाचतांना हसुन हसुन मुरकुंडी वळली.

 
At 10:09 AM, Anonymous विनीत said...

अप्रतिम,
शशांकभाउ कुठे होतात आतापर्यंत? तुमचे लिखाण पु. लं. ची आठवण करुन देते. आपला एक जातवाला (आम्ही सॉफ्ट्वेअरवाले...) इतके सुंदर लिहितो हे पाहून आश्चर्य वाटले. तुमचे पुस्तक कधी प्रसिद्ध होणार? तुमच्या ब्लॉगला RSS ची सोय असती तर बरे झाले असते...

 
At 12:20 AM, Blogger योगेश पितळॆ said...

सsssही, फ़ार मजा आली वाचताना !! सहीच लिहीलयस !! :)

 
At 10:36 AM, Blogger shashank said...

धन्यवाद विनीत आणि योगेश!

विनीत, RSS feed ची सोय कशी देता येईल ते पाहतो आहे.

शशांक

 
At 1:54 AM, Blogger Anu said...

हे लेख ताजेताजे असताना एकदा वाचले होते. आता परत वाचले. खूप हसले.शशांका, तुझ्यात विनोदी लेखनाची 'नॅक' आहे. 'शून्य' पण मला खूप आवडले होते. लिहीत रहा.
-अनु

 
At 9:57 PM, Blogger Saee said...

I apologize for not being able to post in Marathi but I loved your blog.
Me khup hasle. Especially about your sahityik ambitions. I loved the Piwli kawita too.
Bhari ahes tu. Me tuzya blog war Gayatri Natuchya blog warun ale. If you don't mind can I add your name to my blogroll?
I wonder if you check this still because your last post is pretty old.
But it is just awesome. Khusskhushit ahe blog tuza. :)

 
At 4:25 AM, Blogger प्रफ़ुल्ल पाटील said...

फार छान ब्लॉग आहे

 

Post a Comment

<< Home