Tuesday, November 09, 2010

उपक्रम दिवाळी अंक २०१० प्रकाशित झाला आहे. http://diwali.upakram.org इथे पाहा.

Thursday, September 28, 2006

काहीच्या काही कविता - पिवळाई

१.
कसला गोंधळ सुरू आहे
म्हणून पाहायला गेलो तर कळले
ट्रॅफिकचा लोच्या झालाय!
म्युनिसिपालटिने सिग्नलला
फक्त पिवळेच दिवे बसवलेत!

२.
हल्लीच्या डॉक्टरांवरचा
माझा विश्वासच उडालाय
आपल्याला कावीळ होते तेंव्हा
जग खरंच पिवळं असतं म्हणे!

३.
कावीळच असावी बहुतेक
सारे कसे पिवळे पिवळे दिसतेय
दवाखान्यात नेताना मात्र
अचानक म्हणाला
सारे कसे हिरवे हिरवे दिसतेय
मी रिक्षावाल्याला म्हटले,
"वेड्यांच्या इस्पितळाकडे घ्या"

४.
पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेल्या
त्या काळसर तरूणीने
रस्त्यावरून जाताना,
हलकेच मागे वळून
आपले पिवळे दात दाखवले
माझ्या हातात होता
विको वज्रदंतीचा पिवळा डबा!

५.
चाल : पहिला पाऊस पहिली आठवण - सौमित्र

पिवळे टेबल, पिवळे स्टूल
पिवळ्या वेलीवर, पिवळे फूल
पिवळे घर, पिवळे दार
पिवळ्या फोटोला, पिवळा हार ...
पिवळे स्वप्न, पिवळा भास
पिवळ्या केळ्याला, पिवळा वास
पिवळे कुत्रे, पिवळी गाय
पिवळ्या मांजराचे पिवळे पाय
पिवळी जमीन पिवळे आकाश
पिवळ्या दिव्याचा पिवळा प्रकाश
पिवळा रेडिओ, पिवळी गाणी
पिवळ्या नळाला, पिवळे पाणी
पिवळी झोप, पिवळी जाग
पिवळे प्रेम, पिवळा राग
पिवळी गंमत, पिवळा खेळ
पिवळ्या सकाळची पिवळी वेळ
पिवळा कागद पिवळी वही
पिवळ्या पेनाची पिवळी सही
पिवळी कविता पिवळ्या उपमा
पिवळ्या कवीचा पिवळा चष्मा

- शशांक जोशी

This article was first published on www.manogat.com and can be seen here
Get the PDF file of this article.

Wednesday, August 09, 2006

इशारे

प्रेयसीच्या आईच्या कडक पहाऱ्यात लपूनछपून प्रेम करणाऱ्या प्रियकराचे मनोगत.
इशारे
खुणांखुणांनी करू इशारे नकोच बोलू
तिला कळवतील लोक सारे नकोच बोलू

जसा निघे सर्प उंदराला गिळावयाला
कशास आली बया इथे ही मरावयाला
कितीक पाण्यात पाहणारे नकोच बोलू
किती खडे जागते पहारे नकोच बोलू

कधी नव्हे तो निवांत एकांत लाभताना
सखे मनीचे तुझ्यासवे गूज बोलताना
चहूकडे कान ऐकणारे नकोच बोलू
चुगलखोर हे छचोर सारे नकोच बोलू

कधी वाटते कुठे नसावा तिचा सुगावा
तुझ्या नि माझ्या भेटीचा तो सुयोग यावा
नको नको रिस्क घ्यावयाला! नकोच बोलू
खुणांखुणांनी करू इशारे नकोच बोलू

प्रेरणा - वैभव जोशी यांची इशारे ही अप्रतिम कविता.


मनोगत.कॉम वर प्रकाशित झालेली कविता इथे पाहा.
.

Tuesday, June 27, 2006

पाऊस कोसळू दे - संदिग्ध

"पाऊस कोसळू दे" वरून मला सुचलेले काहीबाही. या रचनेला गझल, हझल, विडंबन कश्याच्या दावणीला बांधावे ते कळले नाही त्यामुळे मोकाट/संदिग्ध झाली आहे.


पाऊस कोसळू दे
छपरातुनी गळू दे

घाई कुणास आहे?
तू दे, हळूहळू दे!

बगळ्यास मान दे अन
हंसास कावळू दे

दे बैल दे कधी दे
गायी कधी वळू दे

पाहून या दिव्याला
सूर्यास काजळू दे

सावर मला जरासे,
थोडे घरंगळू दे!

"मूर्खांस टाळणे" हा
सन्मार्ग, मज कळू दे

प्रेरणा - पाऊस, पाऊस कोसळू दे

Sunday, March 12, 2006

माझी साहित्यविषयक महत्त्वाकांक्षा - भाग २

या आधी माझी साहित्यविषयक महत्त्वाकांक्षा - भाग १

माझ्या साहित्यप्रवासाच्या पहिल्या प्रयत्नात जोरदार अपयश आले होते. असे असले तरी, झाल्या प्रकाराने खचून जायचे नाही, साहित्याची सेवा करताना जीव गेला तरी बेहत्तर, काहीही झाले तरी साहित्यसाधना सोडायची नाही, अशा क्रांतिकारी विचारांनी मन भरून गेले. लेखक व्हायचा निर्णय घेतला खरा पण आता पुढे कसे जायचे. इथे पुन्हा माझा छंद कामी आला. अपयश आल्यावर मोठी माणसे काय करतात? निवडणुकीत पडल्यावर नेतेमंडळी, "हा अनीतीचा नीतीवर विजय आहे. ज्यांच्यासाठी आम्ही आमचे घरदार विसरून दिवसरात्र झटलो त्यांना धनदांडग्यांचा 'हात' धरावासा वाटतो? लोकांची सारासारविवेकबुद्धी वाढण्याची गरज आहे", असे विश्लेषण करतात. समीक्षकहृदयसम्राट साहित्यिक, फसलेल्या प्रयत्नांना, "नवा प्रयोग होता, वाचकांची वैचारिक पातळी अजून वाढायला हवी" असे म्हणतात. बिचाऱ्या वैज्ञानिकांना मात्र अपयशाचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडता येत नाही. ते अपयशाचे शास्त्रीय आणि गणिती पद्धतीने विश्लेषण करतात. मी ही ठरवले आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढची पावले टाकायची.

मी झटून कामाला लागलो. मिळतील तेथून आणि मिळतील ती पुस्तके जमा केली. अनेक कथा, कादंबऱ्या, निबंध, नाटके यांचा अक्षरशः वाळवीप्रमाणे फडशा पाडला. असंख्य निरीक्षणे, परीक्षणे आणि समीक्षा वाचल्या. त्यातून गद्य लेखनात असणारे निरनिराळे उप-प्रकार लक्षात आले. ऐतिहासिक, भावनात्मक, रहस्यमय, कौटुंबिक ... यादी बरीच लांब होत होती. अशी लांब यादी पाहता, मारुतीची वाढलेली शेपटी पाहून रावणाची कशी अवस्था झाली असेल याचा अंदाज आला. शेपटीला आग लावण्याची आज्ञा रावणाने का बरे दिली असावी हे ही समजले.

"एकावेळी पूर्ण यादी न पाहता केवळ एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे", थोडक्यात, मोगल, निजाम आणि अदिलशहा या सर्वांना एकदम न डिवचता, एकावेळी एकेकाचा निकाल लावावा असा गनिमी कावा करायचे ठरवले. पण ऐतिहासिक लिखाणाला लागणारे कठीण संशोधनकार्य जमेल की नाही शंकाच होती शिवाय इतिहासाबाबत समाज खूपच संवेदनशील असल्यामुळे चुकून आपल्या लिखाणामुळे कुणाच्या भावना दुखावल्या तर घरात तोडफोड व्हायची. त्यामुळे "माझ्या हातून ऐतिहासिक लिखाण होऊ नये ही श्रींची इच्छा" असा विचार करून मी तो विचार सोडून दिला.

भावनात्मक लिखाण म्हणजे नक्की काय प्रकार आहे हे मात्र कळत नव्हते. सर्व प्रकारच्या लेखकांमध्ये भावनात्मक लेखन करणाऱ्यांचे स्थान सर्वात वरचे. त्यातही पुन्हा दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात कथानक अगदी गोडधोड असते. यातली सगळीच पात्रे सत्ययुगातून किंवा देवलोकातून आल्यासारखी असतात. एकमेकांविषयी प्रेम अगदी ऊतु जात असते. अशा कथांमध्ये घोड्याएवढ्या वाढलेल्या मुलाला आई, "बबडू", "शोनू" अशा हाका मारते. कर्ता, कर्म, क्रियापद सगळ्यांचा 'लडिवाळ अपभ्रंश' केलेला असतो. प्रत्येक वाक्य पूर्णविरामाऐवजी उद्गारवाचक चिन्हाने संपते. अशा कथा वाचताना सर्वसामान्य वाचकांचा चेहरा, अतिशय आंबट चिंच खाल्ल्यावर किंवा गाढ झोपेतून एखाद्याला उठवून त्याच्या तोंडावर विजेरीचा प्रकाशझोत टाकल्यावर जसा दिसेल अगदी तसा होतो. पुन्हा या गोडधोडाच्या पंगतीत विनोदाची फोडणी देण्याचा केविलवाणा प्रयत्नही असतो. अर्थात तो वाचून कोणालाही हसू येत नाही ही गोष्ट निराळी. असले एक पुस्तक एकदा वाचायला घेतले, पहिल्या १/२ पानातच मळमळायला लागले. "डोक्याला मुंग्या येणे" हा शब्दप्रयोग, अशीच एखादी कथा वाचून झीट आलेल्या कोण्या बिचाऱ्याने रूढ केला असावा. मुंग्याच त्या, गोड काही दिसले की येणारच. असला प्रकार जर आपल्याला धड वाचता येत नाही मग लिहिणे दूरच.

दुसरा प्रकार पहिल्याच्या अगदी उलटा. या प्रकारच्या कथा थोड्या गंभीर ढंगाच्या असतात. "भावनांचा सुंदर आविष्कार", "उत्कट, भावनाप्रधान लेखन", "मनातील तरल भावांचे चित्रण" अशा परीक्षणाने गौरवलेली अशी गंभीर पुस्तके वाचून, मी हसून गडबडा लोळत असे. पण मान्यवर लोक मात्र अतिशय गंभीर चेहऱ्याने त्यावर दोन दोन दिवस चर्चासत्रे चालवतात, समीक्षक लोक अगम्य भाषेत मूळ पुस्तकाच्या लांबीइतकी समीक्षा लिहितात. "एका लहान मुलाने बाहेर पावसात भिजणारे कुत्र्याचे पिलू उचलून घरात आणले" ही एका ओळीची कथा ३०/४० पानात अतिशय रटाळ पद्धतीने सांगितली असते. यांच्या कथेतील प्रत्येक पात्र हे "आनंद" मधल्या राजेश खन्नाच्या पात्रापेक्षा हजारपट भावनाप्रधान असते. आजी, आजोबा, आई, वडील, मुलगा, मुलगी, मित्र-मैत्रिणी यांच्यात असणारे संबंध विनाकारण ताणलेले असतात. यातले कोणतेही पात्र समाधानी किंवा आनंदी नसते. एक अतिशय भावनाप्रधान म्हणून नावाजलेली कथा मी वाचायला घेतली. कथेचे नाव होते "हेमाची काकू". कथेचे सूत्र थोडक्यात असे, "लहान असताना हेमाने, काकू दुपारी झोपली असताना तिच्या कानात केरसुणीचे टोक घालून तिची झोपमोड केली, परिणामी हेमाच्या काकूने हेमाच्या कानाखाली त्याचे पडसाद उठवले. पुढे हेमा मोठी झाली पण झाला प्रकार विसरली नाही, पण काही प्रसंगामुळे तिला पश्चात्ताप होऊन पुन्हा सगळे आलबेल झाले". आता यावर लिहिलेली कथा किती मोठी असावी? ५९७ पाने? पहिली १०/१२ पाने वाचूनच गरगरायला झाले. वाचकांना जर ती लेखिका भेटली असती तर त्यांनीही हेमाच्या काकू प्रमाणे प्रतिसाद दिला असता. असो, हा प्रकारही आपल्याला जमणार नाही असा शरणागतीचा सूर उमटला.

रहस्यमय कथा लिहावी तर तिथे शेरलॉक होम्स, ऍगाथा ख्रिस्ती, काळा पहाड, फास्टर फेणे अशा देशी विदेशी गुप्तहेरांपुढे माझा शिकाऊ उमेदवार अगदीच पांडू वाटायचा. त्यांच्यासमोर माझा कसा टिकाव लागणार? तो नादही सोडून दिला. प्रेमकथांचा तर चित्रपट वाल्यांनी चावूनचावून अगदी चोथा केलेला आहे.

कौटुंबिक कथा हा सर्वात जास्त खपणारा माल आहे असे मला संशोधनाअंती आढळून आले. लिहायलाही सोप्या. बाकीचे लेखनप्रकार जर निरनिराळ्या कोरीवकाम केलेल्या मूर्ती असतील तर कौटुंबिक कथा म्हणजे साच्याचे गणपतीच. जास्त विचार करायचा नाही, साच्यात घातली की कथा तयार. कौटुंबिक कथांमध्ये एक भलेमोठे कुटुंब असते. सर्वगुणसंपन्न अशी सून असते. खलनायिकेचे वेगळे पात्र असेल तर ठीक, नाहीतर सासू ते काम करू शकते. सासू चांगली हवी असेल तर मात्र, नणंद, भावजय अशा सहाय्यक खलनायिका हुडकाव्या लागतात. दुष्ट पात्र शक्यतो महिलावर्गातले असावे, पुरूषपात्र तितके परिणामकारक वाटत नाही. सर्वगुणसंपन्न नायिका आणि सर्वावगुणसंपन्न (सर्व+अवगुण+संपन्न) खलनायिका यांच्या जोडीला प्रेमळ सासरे, कर्तबगार नवरा, चहाडखोर शेजारीण वगैरे पात्रे असतात. अगदी बारकाईने अभ्यास करून मी ही एक कौटुंबिक कथा लिहिली. ती घेऊन एका समीक्षकाच्या घरी गेलो असता त्यांच्या ७० वर्षीय मातोश्रींनी, ही कथा जशीच्या तशी, अमुक वाहिनीवरच्या तमुक मालिकेत येऊन गेली आहे असे सांगितले. याशिवाय सर्व कौटुंबिक कथांयोग्य मालमसाला आता वापरून झाला आहे अशीही बातमी दिली. हाय रे दुर्दैव! इथेही आपला निभाव लागणार नाही हे स्पष्ट झाले.

हे जमणार नाही, ते जमणार नाही असे काट मारता मारता यादी कधी संपली ते कळलेच नाही. आपली साहित्यिक बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणे शक्य नाही या विचाराने मला अपार खिन्नता आली. मी उदास चेहऱ्याने गेल्या काही दिवसात जमा केलेला तो पुस्तकाचा ढीग पहात होतो. अचानक माझी नजर "स्वयंरोजगार" या पुस्तकावर पडली.

पुन्हा नव्या उमेदीने एका नव्या दिवसाची सुरुवात केली,
"साहित्य रद्दी भांडार, इथे सर्व प्रकारची पुस्तके रद्दीच्या भावात घेतली व विकली जातील".

समाप्त

शशांक जोशी


This article was first published on www.manogat.com and can be seen here.
Get the PDF file of part 1 and 2 together
.