Thursday, January 19, 2006

दळणवळणाची साधने - सिटीबस

प्रत्येक महाविद्यालयात काही दंतकथा प्रचलित असतात, आमच्या इथेही होत्या. त्यात "वसतिगृहात पूर्वी झालेल्या दुर्भाग्यपूर्ण प्रसंगात बळी गेलेली एक नर्स, रात्रीअपरात्री (हातात मेणबत्ती घेऊन!) फिरताना दिसते" वगैरे सारख्या भूतकथा आणि इतरही काही सुरस, चमत्कारिक कथा होत्या. त्या सर्व कथांबरोबर "सिटीपोष्ट पासून महाविद्यालयापर्यंत रात्री साडेबारा वाजता शेवटची बस येते" अशी त्यातल्या त्यात कमी भयानक पण भयंकर खोडसाळ कथा आमच्या इथे प्रचलित होती. त्या नर्सप्रमाणेच ती बसही कुणीही प्रत्यक्ष पाहिली नव्हती. त्या कथेवर विसंबून रात्रीचा खेळ पाहायला गेलो की नेहमी पायपीट करत यावे लागे. शिवाय गडबडीने कुठे जायचे असेल तेंव्हा नेमकी बस यायची नाही आणि लवकर निघावे तर आपल्या स्वागताला बस हजर. एकूणच तेथील सिटीबसवाले भारीच खोडकर असावेत, मोक्याच्या वेळी झुलवणे हा त्यांचा आवडता खेळ होता. अश्याप्रकारे सिटीबसचा फार चांगला अनुभव आला नसला तरी, फार दुःख झेलावे लागले अशीही परिस्थिती नव्हती.

असे अनुभव घेऊन पुणेग्रामी येताच वाटले की "सार्वजनिक-परिवहन-सौख्यात" अडथळा आणणारे वक्री ग्रह आता मार्गी होतील. पण कसचे काय? उलट त्या सर्व वक्री ग्रहांमध्ये पीएमटी नामक आणखी एका पापग्रहाची भर पडली. पीएमटीच्या गाड्या "चालतात" यावर प्रथमदर्शनी विश्वास बसणे अवघड गेले. एका बाजूला इतक्या झुकलेल्या असतात की चालताचालता कलंडतील की काय अशी भिती वाटायची. सुरुवातीला "पुणे स्टेशन ते कर्वेनगर" बहुतेक १४३ नंबर, बसची "दशा" सुरू झाली. निर्धारित वेळेच्या अर्धा ते दीड तास उशिरा येणे नेहमीचेच. बाकी नागरिक बहुतेक सरावलेले असावेत, कारण बसस्टॉपवर मी एकटाच वेड्यासारखा उभा असे. येणारेजाणारे लोक आणि आजूबाजूचे दुकानदार प्राणिसंग्रहालयात नवीनच आलेल्या प्राण्याकडे पाहावे तसे पाहत असत.

बसस्टॉपरचा छळ कमी की काय म्हणून बसच्या आत विशेष छळ होत असे. तिथे कंडक्टर नामक अट्टल पुणेकराची (खरेतर अस्सल लिहिणार होतो, पण अट्टल लिहिले गेले, असो, आता बदलायची इच्छा होत नाही) सत्ता असते. तिथे चोर-सन्यासी असा भेदभाव नसतो, सर्वांनाच चोराप्रमाणे वागणूक दिली जाते. ३:७५ रुपये तिकीट असेल आणि चार रुपये सुटे असले तरी छातीत धडधडायचे, न जाणो सत्ताधीशाची मर्जी फिरली तर दीड तास वाट पाहिलेल्या बसमधून मानसन्मानासह उतरवेल. तिकीट घेऊन रिकामे आसन दिसते का पाहावे लागे. हो, गाडीत रिकामे बाकडे असतानाही कुणाच्या शेजारी बसायला गेलात तर जळजळीत कटाक्ष आणि कपाळावर, गतिरोधकाला लाजवतील अश्या आठ्या पाहाव्या लागतात.

बरे, चालत जावे तर कुठला "आतंकवादी" कधी हल्ला करेल सांगता यायचे नाही. दुचाकी मला रस्त्यावर चालवता येते पण इथे तोही मार्ग नव्हता, कारण इथे खड्डे, बोळ, खिंडीमधून चालवण्याचे विशेष कौशल्य लागते. शिवाय खिंड लढवायला एखादी चतुष्पाद मोकाट गाय किंवा म्हैस पुरेशी असते. एकूणच जीव मुठीत धरून बरेच दिवस काढल्यावर, परमेश्वराला माझ्या हलाखीच्या परिस्थितीची दया आली असावी किंवा पापग्रहांना बहुतेक वाकडे चालण्याचा कंटाळा येऊन ते मार्गी झाले असावेत, काहीही असो पण प्रतिकूल काळ संपून अनुकूल काळाची सुरुवात झाली. तसा सदासर्वदा प्रतिकूल काळ नव्हता, कधीकधी अनियमित बसच्या निमित्ताने "प्रियजन-द्विचक्र-सहप्रवास-योग" (विशेष व्यक्तींच्या दुचाकीवरून फिरण्याचे प्रसंग) देखील आले, पण असे अनुभव तुरळकच.

भारतात सर्वात चांगला अनुभव आला तो "बेस्ट" चा. ही संस्था आपले नाव सर्वार्थाने सार्थ करते. मुंबईतील रस्त्यांवर एकछत्री अंमल जर कुणाचा असेल तर तो बेस्टच्या गाड्यांचा. "रस्त्यावर पहिला अधिकार बेस्टचा" हे मुंबईकर ओळखून असतो. बेस्टची बस नजरेच्या टप्प्यात असताना, आपण कितीही चपळ असल्याचा अभिमान असला तरी, रस्ता ओलांडण्याच्या भानगडीत पडू नये. सकाळी आणि संध्याकाळी या बस खचाखच भरलेल्या असतात, अशावेळी बेस्ट बसमधून प्रवास न केलेल्या लोकांनी, खचाखच म्हणजे शब्दशः खचाखच असे वाचावे. त्यावेळी बसमध्ये उभे राहण्यासाठी कुठल्याही आधाराची गरज नसते कारण, तोल जाण्यास थोडासाही वाव नसतो. याहून जास्त गर्दी अर्थातच लोकलमध्ये असते. माझा चुलतभाऊ म्हणतो त्याप्रमाणे, मुंबईत दोनच शक्यता आहेत, एक म्हणजे गर्दी आणि दुसरी, खूप गर्दी. अश्या गर्दीतही कंडक्टर आपले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आजच्या युगात स्थितप्रज्ञ कोण असे जर कोणी विचारले (मला कोण विचारणार आहे? पण समजायला काय जातेय?) तर मी सांगेन खचाखच भरलेल्या गाडीत, संयम ढळू न देता आपले काम जास्तीतजास्त चोखपणे करण्याचा प्रयत्न करणारा बेस्टचा कंडक्टर.

आपल्याला ज्या स्टॉपवर उतरायचे असेल, त्याच्या दोन स्टॉप आधीपासून पुढे जाण्याच्या दृष्टीने हालचाल (शब्दशः) सुरू करावी लागते. "इच्छित स्थळी उतरण्याची काळजी प्रवाशांनी घ्यावी" अशी सूचना पुणेरी वाटली तरी, या सूचनेमागे शिष्टपणा नसून वास्तवाची जाणीव आहे हे रोज प्रवास करणाऱ्यांना कळून येईल. याप्रमाणेच "प्रवाशांनी आपले सामान स्वतःच्या मांडीवर ठेवावे" यामध्ये "स्वतःच्या" जास्तीचा वाटेलही, आपले सामान दुसऱ्याचा मांडीवर कोण कशाला ठेवेल? पण संशयाला/गोंधळाला थोडाही वाव न ठेवण्याचे बेस्टचे धोरण असावे, त्यामुळेच "६० वर्षावरील वृद्ध आणि गरोदर स्त्रियांना पुढील दरवाज्याने चढण्याची मुभा" याबरोबरच "सुरुवातीच्या स्थानका व्यतिरिक्त" असे लिहिले असते.

तर अशी ही सिटीबस, असंख्य लोकांच्या रोजच्या आयुष्याशी जोडली गेलेली. "बसमध्ये शेजारी किंवा समोर कोणी प्रेक्षणीय नसेल, तर पुढच्या स्टॉपवर कोणीतरी चढेल" असा आशावाद आणि "कोणी असेल तर, पुढच्या स्टॉपला उतरूही शकेल, जास्ती गुंतागुंत नको" असा वैराग्यपूर्ण निराशावाद दोन्हीचा एकत्र अनुभव सिटीबसमध्येच येऊ शकतो. मानवी जीवनाच्या आणि नातेसंबंधांच्या क्षणभंगुरपणाविषयी बोलताना विचारवंतांनी अशा रोजच्या जीवनातील उदाहरणाचा वापर करायला हरकत नाही. एकंदर सिटीबसचा संपर्क नेहमी येत असला तरी सिटीबसचे प्रवाशांशी संबंध कधी जिव्हाळ्याचे बनू शकत नाहीत, त्याला दोघांचाही इलाज नसतो. कधीकधी काही व्यक्ती आपल्याला आवडतात, त्या व्यक्तींनाही आपण आवडत असतो पण नियतीने ठरवलेला सहवास मर्यादित असल्याने या उपक्रमातून आठवणींशिवाय काहीच हाती लागत नाही अशी काहीशी गत असते.

शशांक जोशी

यासारखेच दळणवळणाची साधने - बस

This article was first published on www.manogat.com and can be seen here.

Get the PDF file of this article.

.

Monday, January 16, 2006

दळणवळणाची साधने - बस

दळणवळणाच्या साधनांशी माझी पहिली भेट कधी झाली हे नक्की आठवत नाही. पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या ना त्या कारणाने भेट होतच राहिली. बसपासून बोटीपर्यंत आणि "वडाप"पासून विमानापर्यंत निरनिराळ्या रूपात आणि धावत्या, तरंगत्या, उडत्या अशा निरनिराळ्या अवस्थेत गाठभेटी होतच राहिल्या

सर्वात पहिल्यांदा आयुष्यात आली ती 'बस'. लहानपणी, कर्नाटकाने बळकावलेल्या मराठी भागात आमचे वास्तव्य होते. बरेचसे सगेसोयरे महाराष्ट्रात, त्यामुळे खूपदा आंतरराज्य प्रवास करावा लागत असे. तेंव्हा कर्नाटक आणि महाराष्ट्र असे बसचे दोन पर्याय असत. कर्नाटक एष्टीला वेगमर्यादेचे बंधन नसल्याने ते गाड्या सुसाट पळवीत. शिवाय गाडीच्या आतला फिकट पोपटी रंग पाहून मळमळायला होत नसे. खिडक्याही पुढे-मागे सरकवायच्या असत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या गाड्यांमध्ये ड्रायवरला जाळीच्या पिंजऱ्यात कोंडलेले नसे, त्यामुळे थेट ड्रायवरच्या शेजारी बसून गाड्यांचा पाठशिवणीचा खेळ अगदी जवळून बघता येत असे. याउलट महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या गाड्यांच्या गळ्यात वेगमर्यादेचे लोढणे असायचे. आतला गडद हिरवा रंग नकोसा वाटायचा. औरंगजेबाचे हिरवे मोगली सैन्य जसे "दीन दीन" करत बालशिवाजींवर चालून जायचे तसे ते गडद हिरवटलेले वातावरण आम्हा मावळ्यांवर चालून यायचे. खिडक्याही उघडण्यासाठी वर सरकवाव्या लागत आणि वर गेलेल्या खिडक्या वरच राहाव्यात यासाठी त्या खिडक्यांचे वजन न पेलवणाऱ्या दोन छोट्या पट्ट्या असत. फार काळ तग धरणे त्यांना मानवत नसे. शिवाय रस्ताही असा चावट की त्याच्या गुदगुल्यांनी बस अगदी खळखळून हसायची, त्यामुळे त्या चुकार पट्ट्यांना आयतेच निमित्त मिळून, बालगणेशाने जसे रावणाने धरायला दिलेले शिवआत्मलिंग जड झाल्याने खाली सोडून दिले, तसे त्यांना सांभाळायला दिलेले खिडकीचे तावदान खाली यायचे. एखादा बेसावध उतारू खिडकीत हात ठेवून बसला असेल तर झालेच, बिचाऱ्याचा शाइस्तेखान व्हायचा.

जाणाऱ्या गाड्यांची पाठवणी, येणाऱ्या गाड्यांचे स्वागत आणि काही गाड्यांना रात्रभर आसरा देण्याचे महत्त्वपूर्ण काम बसस्थानक करत असते. बसस्थानकाइतके विहंगम दृश्य खचितच कुठले असेल. कित्येक तास काहीही न करता बसस्थानकावर घालवता येतील इतकी विविधता आणि करमणूक तिथे असते. जात-पात, धर्म, सामाजिक, आर्थिक विषमता अशी सर्व बंधने नाहीशी होऊन एकसंध समाजाचे रंगीबेरंगी चित्रच जणू तिथे उमटलेले असते. "काळजी घे", "सांभाळून राहा", "पोचल्यावर फोन कर" पासून "तुझ्याशिवाय करमणार नाही" इथपर्यंत निरनिराळे सूर उमटत असतात. कुठे तंबाखूची देवाणघेवाण करत जानुमा, पांडबा, मल्हारी यांचा परिसंवाद चालू असतो, कुठे कामाला निघालेले पांढरेपेशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांवर, फुकटचीच, पण चर्चा करत असतात, महिलामंडळात नवीन पाककृतींपासून काल मालिकेत काय झाले, ह्याने/तिने असे करायला नको होते वगैरे चर्चा होत असते मधूनच चहाड्यांची देवाणघेवाणही सुरू असते, कुठे महाविद्यालयीन पाखरांचा किलबिलाट सुरू असतो, कुठे नुकत्याच आलेल्या गाडीभोवती फेरीवाल्यांची गर्दी झालेली असते आणि त्यासर्व पसाऱ्यापासून अलिप्त अशी खाकी गणवेशधारी मंडळी निष्काम कर्मयोग्याप्रमाणे आपले काम करत असतात.

बसप्रवास बहुतेकवेळा दोन, तीन तासांचाच पण वैशिष्ट्य असे की गाडी सुरू होताच काही मिनिटातच झोप येण्यास सुरुवात होते. कितीही झोप झालेली असो, कितीही कप चहा घेतलेला असो, झोप चष्म्यांमधून, वर्तमानपत्रांआडून, शेंगदाणे/फुटाणे चुकवीत आपल्या डोळ्यात येतेच. आपल्याला तीस चाळीस लोकांसह एका मोठ्या पाळण्यात घालून ड्रायवर झोके देतोय आणि कंडक्टर "तिकिट तिकिट", "हांऽऽ इकडे कोण तिकिटाचे?" किंवा "याऽऽर इल्लेऽऽऽ?" का आणखी काही अंडुगंडू भाषेत अंगाई गातोय आणि त्याचबरोबर आपल्या हातातील खेळण्याने "टिक् टिक् टिक् टिक्" असा आवाजही करतोय असे एकंदर जागे राहण्यास कठीण वातावरण असते.

प्रवास दूरचा आणि रात्रीचा असेल तर विचारू नका. सहप्रवासी, आता पंधरा दिवस मुक्काम बसमध्येच अश्या जय्यत तयारीनिशी आलेले असतात. कानटोप्या, स्वेटर, शाली आणि कधीकधी उशीदेखील! शिवाय बहुतेकांनी आपले जेवणही बरोबर आणलेले असते. कुठे मम्मी, पप्पा आपापल्या पिंकी, बंटीबरोबर प्लॅस्टिकच्या डब्यांतून चमच्याने काही खात असतात, तर कुठे भागामावशी आपल्या अंत्या आणि गंगीबरोबर झुणकाभाकर खात असते. खाद्यपदार्थात मुख्यत्वे कोरडे पिठले, कांदा बटाट्याची सुकी भाजी, लसणाची किंवा नुसती शेंगदाण्याची चटणी आणि पोळी किंवा भाकरी, गुजराती कुटुंब असेल तर दशमी, खाकरा, लोणची आणि बारा भानगडी. जिकडे पाहावे तिकडे मंडळी मस्त मांडी घालून बसून चवीने खात असतात. आपण अगदी पोटभर जेवून घरातून बाहेर पडलेले असतो, "आणखी थोडी खीर देऊ का?" किंवा "शेवटी थोडा दहीभात तरी खायचा होतास" असे आईचे वात्सल्य उतू जात असते, आपण मात्र "नाही बुवा, आता पाणी प्यायला सुद्धा पोटात जागा नाही" असे म्हणून उठतो. इतके होऊनही गाडीत सुटलेल्या घमघमाटाने, नाही म्हटले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतेच.

खाण्याचा कार्यक्रम संपल्यावर पाण्याच्या बाटल्यांची देवाणघेवाण सुरू होते. मंडळी भरपेट खाऊन वर पाणी पिऊन मस्त ढेकर देत असतात. आपण मात्र खारे शेंगदाणे किंवा लिमलेटच्या गोळ्या चघळून, तोंडाला सुटलेले पाणी कसेबसे गिळत असतो. खाद्यमेळ्यानंतर मंडळींना झोपायचे वेध लागतात. मग अंत्या, बंटी असे पौगंडावस्थेतील वीर उभे राहून वळचणीला कोंबलेल्या पिशव्या आणि बॅग्ज उपसतात. "चालत्या बसमध्ये उभे राहून मी पिशवी काढली" आणि "माझा हात वरपर्यंत पोहोचतो" याचे त्यांना भारीच कौतुक असते. स्वेटर, कानटोप्या आणि शाली बाहेर निघून आपापल्या जागी ड्यूटीवर जातात. लहान मुले आईच्या मांडीवर आणि ज्येष्ठ मंडळी शेजाऱ्याच्या खांद्यावर डोके ठेवून निद्रादेवीची आराधना करू लागतात. बसमधले दिवेही खास प्रवाशांच्या झोपेत अडथळा येऊ नये, किंबहुना झोप येण्यास सहाय्यक व्हावेत असेच असतात. गडद हिरवा, गडद निळा वगैरे रंगात, रंगाऱ्याला मोबदला न देता रंगवून घेतल्यासारखे ते असतात. त्यांच्यामुळे एकूणच झोपेस पोषक अशी वातावरणनिर्मिती होते.

काही वेळाने कंडक्टर आपले हिशोबाचे संपवून पुन्हा एकदा गाडीतले उतारू मोजून घेतो. सगळे झाल्यावर घंटी वाजवून किंवा कर्नाटकाच्या गाडीत दोनवेळा शिटी वाजवून ड्रायवरला "मालवून टाक दीप" असा संदेश देतो. ड्रायवरही एकदा मागे नजर टाकून सर्व दिवे मालवून टाकतो. गाडीचा एकसुरी आवाज आणि सहप्रवाशांचे घोरण्याचे बहुसुरी आवाज एकत्र येऊन एक वेगळाच माहौल बनलेला असतो आणि "म्हैस" मध्ये पुलंनी म्हटल्याप्रमाणे त्या झोपी गेलेल्या गाडीत ड्रायवरला सोबत म्हणून फक्त आपण जागे असतो.

शशांक जोशी

यासारखेच दळणवळणाची साधने - सिटीबस

This article was first published on www.manogat.com and can be seen here

Get the PDF file of this article.

.

Sunday, January 15, 2006

कचेरी !

तुमची कचेरी कशी आहे? "अशी" आहे का?

(चाल : "मनाचे श्लोक", "अकेले अकेले कहां जा रहे हो" किंवा "प्रिया आज माझी नसे साथ द्याया"1)



कचेरी

अरे कर्मचाऱ्या तुझी ही कचेरी,
इथे फक्त मॅनेजराची मुजोरी

न मॅनेजराचा कधी वेळ जातो
मिटिंगा मिटिंगा सदा खेळ2 होतो

पगारात देऊ नये वाढ कोणा
अखेरीस अप्रेज़लाचा बहाणा

हुशारी दुज्यांची परी नाव याचे
कधी वापरावे न डोके स्वतःचे

कुठे मूर्ख यासारखा सापडावा?
तरी सर्व करतात याचीच वावा!

शशांक जोशी



1 "अकेले अकेले" आणि "प्रिया आज माझी" ह्या चालीवर म्हणता येते हे तथ्य टग्यानामक बुद्धिमान मनोगतीकडून समजले. आधी हा ऋणनिर्देश करायचा राहून गेला होता त्याबद्दल क्षमस्व.
2 मॅनेजर लोकांचा वेळ जात नाही म्हणून ते "मिटिंग मिटिंग" खेळतात.


This was first published on www.manogat.com and can be seen here.

Get the PDF file of this article.

.

शून्य - एक संगणकीय कविता

नुकतीच ही कविता वाचली

माझ्याकडे एक शून्य आहे,
तुझ्याकडेही असावं.
चल, शून्याला शून्याने भरण्याचा प्रयत्न करुया.

हे वाचून मला खालील कविता (?) सुचल्या

१.

माझ्याकडे शून्य नाही आहे.

२.

माझ्याकडे एक शून्य होते,
पण आता नाही आहे.

३.

माझ्याकडे एक शून्य आहे,
तुझ्याकडेही असावं ..
काय? तुझ्याकडे नाही?!
जाऊदे मग!

४.

माझ्याकडे एक शून्य आहे,
तुझ्याकडेही असावं.
चल, शून्याला शून्याने "भागण्याचा" प्रयत्न करुया!


आता ही कविता ऐकवू कोणाला असा विचार करता करता संगणक दिसला (समोरच असतो ;) संगणकाला समजणाऱ्या भाषेत ही कविता पुन्हा लिहिली.

अशी .....




आणि कंपाइल करून ऐकवली/पळवली (रन केली;)





Floating point exception!!!

संगणकाला कविता इतकी आवडली की तो आनंदाने "तरंगतोय" (floating).

कविता अगदी मुद्द्याला धरून आहे म्हणतोय (point).

हे काहीच नाही तर कविता "असामान्य" (exception(al)) आहे असेही म्हणतोय.


तात्पर्य : लिनक्समध्ये देवनागरी कुठेही वापरता येते.



हे वाचून एकीने विचारले, "डिवाईड बाय ज़िरो एरर" कशी नाही आली?

तर त्याला मी उत्तर दिले .....

संगणकाच्या भाषेत लिहिलेल्या कवितेत वेरिएबल्स वापरलेली असल्याने 'कशाने' भागतोय याच्याशी संगणकाला काही देणेघेणे नव्हते. शून्य ही किंमत प्रत्यक्ष कविता ऐकवताना (रन करताना;) दिल्याने "Floating point exception" असा प्रतिसाद आला.

मूळ कवितेतच जर शून्याने भागले तर मात्र संगणक समीक्षकाच्या भूमिकेत जाऊन आक्षेप घेतो :)
हे पाहा,





हे लिखाण पीडीएफ प्रकारात पाठवून दे असे बऱ्याच मनोगतींनी सांगितले. पण त्यामागचे खरे कारण ती पीडीएफ त्यांच्या मित्रांना पाठवून त्यांना (दुसऱ्यांच्या मानसिक छळ करून मिळणारा) आसुरी आनंद घ्यायचा असे होते हे मला नंतर कळले. असो. कोणाला ती पीडीएफ हवी असल्यास इथून उतरवून घेता येईल.

शशांक जोशी

.

Tuesday, January 03, 2006

सुस्वागतम!

नमस्कार रसिकहो!

"समग्र शशांक जोशी" वर तुमचे स्वागत आहे. नियमित येत राहा आणि प्रतिक्रिया देत राहा

तुमचा मित्र,


शशांक